वालोपेतील हातभट्टी उद्ध्वस्त, गोवळकोटमध्ये जुगार अड्डय़ावर छापा
चिपळूण
शहरासह वालोपे येथे बेकायदा चालणाऱया दोन अवैध धंद्यांवर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून 1 लाख 25 हजार 70 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वालोपेतील हातभट्टी पोलिसांनी उद्ध्वस्त केली आहे.
विद्येश चंद्रकांत खाडे (वालोपे-गणेशवाडी) हा वालोपे-वाशिष्ठी नदीकिनारी बेकायदा हातभट्टीची दारु काढण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे गुरुवारी सकाळी 9 वाजता पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत नवसागर, गावठी दारु, तसेच इतर सहित्य असा एकूण 57 हजार 640 रुपयाचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी केला. तसेच गावठी दारुचे रसायनाने भरलेले ड्रम ओतून हातभट्टीही उद्ध्वस्त केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार पी. एल. चव्हाण, हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर, सुभाष भुवड आदींच्या पथकाने केली. याबरोबरच गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास शहरातील गोवळकोट धक्क्यावरील मुख्य पुलाच्या खाली बेकायदा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी धाड टाकून नैम मोहम्मद सुर्वे, मन्सूर उन्सान पटेल, हरी मानसिंग चव्हाण, अस्लम हसन मालानी, जलिल खतिब, गौस सुर्वे (सर्व गोवळकोट) यांना अटक करत त्यांच्याकडून 67 हजार 430 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक समेद बेग, संदीप वांगणेकर, पोलीस कर्मचारी संदीप शिंदे, आशिष भालेकर, वैभव शिवलकर, पंकज पडेलकर यांच्या पथकाने केली.









