पिंपळी खुर्द येथील घटनेने तणाव, कामथेनंतर आठवडय़ातील दुसरी घटना
वार्ताहर/ चिपळूण
कामथे येथील गोवंश हत्त्येची घटना ताजी असतानाच पिंपळी खुर्द येथेही काहीसा असाच प्रकार उघड झाल्याने संताप व्यक्त होत आहे. घटनास्थळी काही जनावरांच्या अवशेषांसह रक्ताचा सडा पडला होता. ही घटना मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास उघडकीस आली. तालुका परिसरात वारंवार घडणाऱया या घटनांमुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे. दरम्यान, या दोन्ही घटनांच्या तपासासाठी पोलीसांनी तीन पथके नेमली असून यापुढे सर्वच नाक्यांवर कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
तालुक्यातील कामथे-हरेकरवाडी येथे पाच दिवसांपूर्वी गोवंश हत्येची घटना घडली होती. पोलिसांनी आरोपीला लवकरच गजाआड करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमाव शांत झाला होता. या घटनेला आठवडाही होत नाही तोच कराड राष्ट्रीय महामार्गाशेजारी पिंपळी खुर्द येथे पायरवण कॅनॉलशेजारील कोयना प्रकल्प जाग व गंगाराम आनंदा कदम यांच्या शेतजमिनीत काही प्राण्यांचे अवशेष व रक्त आढळून आले. घटनास्थळी दोरी व प्लास्टीक ड्रमही सापडला. पोलीस पाटील दीपाली भाबले यांनी चिपळूण पोलिसांना याबाबत माहिती दिली. याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. साधारण चार ते पाच जनावरे कापल्याचा अंदाज असून गोवंश हत्येचा संशय अनेकांनी व्यक्त केला. पंचायत समितीचे सदस्य प्रताप शिंदे, राजू खेतले, संतोष नलावडे, सदानंद सागवेकर यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधी व पोलिसांनी संतप्त जमावाला शांत केले
उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाहब नाइकवडे आदी पोलीस अधिकारी आपल्या फौजफाटय़ासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. कामथेप्रमाणेच पिंपळी खुर्द येथेही प्राण्यांची कत्तल केल्याचे दिसून आले.
अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत
घटनास्थळी सापडलेले अवशेष तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आले आहे. या अहवालानंतरच नेमक्या कोणत्या प्राण्याची हत्या झाली याची माहिती मिळू शकेल असे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांनी सतर्क रहावे
कामथे किंवा पिंपळीतील घटनांतून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम राखण्याबरोबरच सतर्कही राहण्याची गरज आहे. अशा घटनांबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन चिपळूण व खेड उपविभागातील अधिकाऱयांना तपासाबाबत सूचना केल्या. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या गस्तीत वाढ करण्यात येणार असून पोलीस तपासणी चौक्यांवर प्रत्येक वाहनाची सरसकट तपासणी केली जाणार आहे. तसेच तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.
पोलीसांसमोर आव्हान
गतवर्षी लोटे येथे 26 जानेवारीला गोवंश हत्येचा प्रकार घडून तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने जाळपोळ केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या घटनेला वर्ष होत नाही तोच यावर्षीही 16 जानेवारीला कामथे येथे व आता मंगळवारी पिंपळी येथे असा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनांच्या पार्श्वभुमीवर पोलिस दलासमोर तपासाचे आव्हान उभे राहीले आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अज्ञाताविरोधात येथील महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर चव्हाण करत आहेत.









