जीएसटी, रेरासह कोरोनाचा बांधकाम व्यावसायिकांना मोठा फटका
प्रतिनिधी/ चिपळूण
शासनाची भरमसाठ जीएसटी, रेरा आणि आता आलेला कोरोना यामुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडले आहे. येथे सुमारे 1 हजार 400 परिपूर्ण असलेल्या सदनिका ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मोठय़ाप्रमाणात साहित्याच्या दरात होणारी वाढ व्यावसायिकांचे कंबरडे मोडणारी आहे. मात्र सदनिका पडून राहू नयेत म्हणून दर कमी करण्यात आले आहेत. तरीही ग्राहक खरेदी करीत नसल्याने व्यावसायिकांनी डोक्याला हात लावला आहे.
गेल्या काही वर्षापासून वेगवेगळय़ा कारणांनी बांधकाम व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यात मोदी सरकारने आणलेला जीएसटी, रेरा यामुळे या अडचणीत आणखीनच भर पडली. त्यातून हा व्यवसाय उभारी घेत असतानाच मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट आले आणि हा व्यवसाय आणखीनच अडचणीत आला. त्यामुळे तो आता कधी उभारी घेईल हे निश्चित सांगता येत नसल्याचे सांगितले जात आहे.
चिपळूण शहर, खेर्डी, वालोपे, कळंबस्ते, मिरजोळी, कापसाळ आदी परिसराचा विचार करता येथे सुमारे 1 हजार 400 सदनिका परिपूर्ण असून त्यांची खरेदीच होताना दिसत नाही. चार वर्षे मागे जाता अनेक भागात 3 हजार रूपये स्क्वेअर फूट दराने सदनिकांची विक्री होत होती. हा दर आता 2 हजार 500 रूपयांपर्यंत आणण्यात आला आहे. तरीही विविधप्रकारचे लागणारे कर लक्षात घेता कोणीही या सदनिका खरेदी करण्यास राजी होताना दिसत नाही. याचा फटका व्यावसायिकांना बसत असून ते आर्थिक संकटात सापडले आहेत.
साहित्याचे दर गगनाला
एकीकडे नव्या इमारती बांधायच्या की नाही, असा प्रश्न बांधकाम व्यावसायिकांसमोर असताना दुसरीकडे त्यासाठी लागणाऱया साहित्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत चालेले आहेत. यापूर्वी 42 ते 46 रूपये किलोने मिळणारे लोखंड आता 50 रूपये किलोवर गेले आहे. सिमेंटचा दर तर वाढतच असून सध्या ते 340 ते 360 रूपये बॅग याप्रमाणे विकले जात आहे. खडी व ग्रीटला सोन्याचा भाव येत असून ते 2 हजार 500 रूपये ब्रास, तर काहीजण त्यापेक्षा अधिक दराने विकत आहेत. याचाही फटका बसत आहे.
चोरटी वाळू खिसा कापतेय
गेल्या काही महिन्यांपासून येथे वाळू उत्खननाला परवानगी नाही. त्यामुळे काही भागात चोरटे वाळू उत्खनन व वाहतूक सुरू आहे. मात्र त्याचा दर ब्रासला 6 ते 7 हजार रूपये इतका आहे. त्यामुळे वाळू बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचा खिसा कापत आहे.
जांभा व्यावसायिकांचे भांडण ग्राहकांच्या पथ्यावर
एकीकडे सर्वच साहित्याचे दर वाढत असताना जांभ्याचे दर मात्र कमी होताना दिसत आहेत. याला जांभा व्यावसायिकांमधील भांडणे कारणीभूत ठरत असून ते ग्राहकांच्या पथ्यावर पडत आहे. पूर्वी जांभा 20 रूपये नग या दराने जागेवर विकला जात होता. मात्र व्यवसायातील स्पर्धेमुळे लागलेल्या भांडणाने हा दर सध्या 12 ते 13 रूपये नगावर आणला आहे. यातील गंमत म्हणजे जी यंत्रसामुग्री लावून हा जांभा तयार केला जातो त्या व्यावसायिकाला हा जांभा 12 ते 13 रूपयाने विकावा लागत आहे. मात्र या जांभ्याला काहीही न करता जोडणाऱया कारागिराला प्रतीजांभा 20 रूपये मिळत आहेत.
जमिनींचा वाढता भाव अन् उतरती कळा
दरवर्षी दसरा, दिवाळीपूर्वी अनेक बांधकाम व्यावसायिक इमारती उभ्या करून्। तर काहीजण या मुहुर्तांवर शुभारंभ करून ग्राहकांना विविध योजना जाहीर करून आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र यावर्षी सर्व अडचणी लक्षात घेता असे करता आलेले नाही. याला जागा मालकांचा जमिनीचा वाढता भाव हेही मुख्य कारण आहे. जर जमिनींचे दर असेच चढे राहिले तर मात्र नजीकच्या काळात नव्या इमारती उभ्या राहण्याची शक्यता कमी आहे.
निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता
दरवर्षी पावसाळय़ात सिमेंट, लोखंड आदीप्रकारच्या साहित्याचे दर कमी केले जातात. कामे बंद रहात असल्याने त्याचा तितकासा फायदा ग्राहकांना होत नाही. मात्र पावसाळा संपताच हे दर वाढवले जातात. या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्लीत शासनाचा एक खास विभाग आहे. या विभागाकडे येथील क्रेडाई या संस्थेने निवेदन दिले होते. याला आता अनेक महिने उलटले तरी त्यावर या विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने या निवेदनाला या विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.









