उक्ताड बेटावर नागरिकांचा विरोध, महत्वपूर्ण बेटावरील काम थांबवल्याने अडचणी
चिपळूण
गतवर्षापासून पूरमुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने यावर्षी मुंबईतील बैठकीत वाशिष्ठी नदीतील पहील्या टप्प्यातील गाळ उपसाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार यंत्रसामुग्री लावून चार ठिकाणी गाळ उपसाही सुरू केला. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतत विरोध होत असलेल्या उक्ताड बेटावरील गाळ उपसा विरोधाच्या सुरात स्थानिक राजकीय नेतेमंडळीनीही सूर मिसळत फोनाफोनी सुरू केल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर नाम फाऊंडेशनने तेथील गाळ उपसा थांबवला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गाळ उपसाला गती नसल्याने आणि त्याबाबत स्थनिकांत असंतोष पसरत चालल्याने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दखल घेत मुंबईत बैठक घेतली होती. वरिष्ठ अधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील शिल्लक सर्व गाळ काढण्याची जबाबदारी नाम फाउंडेशनने स्वीकारल्यांनतर पुन्हा गाळ उपसाला गती आली. फाऊंडेशनने नुकतेच मल्हार पाटेकर यांच्या उपस्थितीत यंत्रसामुग्री लावत उक्ताड, गोवळकोट धक्का, पेठमाप, बाजारपूल गणेश घाट अशा चारही ठिकाणी गाळ उपसाचा शुभारंभ झाला.
गाळ उपसा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून उपसाला विरोध केला जात असल्याचे पुढे येत असले तरी उपसा मात्र सुरूच आहे. उक्ताड येथील बेट आणि तेथील गाळ उपसाचे काम गतवर्षापासून सुरू आहे. तेथेच लोकवस्ती असल्याने या बेटावरून तेथे जाण्यासाठी रॅम्प आणि रस्ता असल्याने तेथे नागरिकांचा विरोध वाढत आहे. अशातच काही राजकीय नेतेमंडळीनी नागरिकांच्या बाजूने नाम फाऊंडेशनला फोनाफोनी करत असल्याने अखेर सोमवारी दुपारनंतर येथील गाळ उपसा थांबवण्यात आला आहे. येथे दोन पोकलेन आणि पाच डंपर उपसा करीत होते. आणखी यंत्रसामुग्री लावण्यात येणार होती. मात्र अशातच काम बंद पडल्याने आता प्रश्न निर्माण झाला आहे.
गोवळकोट धक्यासह उर्वरित ठिकाणचा गाळ उपसा सुरू आहे. नदीपात्रातील गाळ उपसा करणाऱया काही भागांचे रेखांकन पूर्णत्वास गेले आहे. मात्र तरीही त्यावर काहींचा खासगी कब्जा असल्याने विरोध होत असल्याचे पुढे येत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांना विरोध होत असलेल्या ठिकाणी अधिक लक्ष देऊन मार्ग काढण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र त्याची तितकीशी अंमलबजावणी प्रशासनाकडून होताना दिसत नसल्याचा सूर उमटू लागला आहे.








