दळवटणे येथील घटना, तब्बल 16 बैलांची वाहतूक, स्थानिकासह सांगलीच्या तिघांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी
प्रतिनिधी / चिपळूण
सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच या संधीचा फायदा घेत तब्बल 16 बैल कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या कंटेनरला चिपळूण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दळवटणे येथे घडली. यापकरणी एका स्थानिकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
अलिमिया चौघुले (खेर्डी ), अतुल अरुण पवार (23, पेठनाका-सांगलीफाटा), दुर्गेश शंकर जाधव (19, इस्लामपूर पेठनाका-सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक आशिष अशोक भालेकर यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दळवटणे परिसरातून गुरे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेद बेग यांनी एक पथक तयार केले. बुधवारी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हे पथक दळवटणेकडे रवाना झाले. याचवेळी गावातून कन्टेनर येताना त्यांना दिसला. त्यास दळवटणे पुलाजवळ थांबवून पोलिसांनी चालकाकडे पाथमिक चौकशी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला कन्टेनरचा मागील दरवाजा उघडण्यास सांगितले असता त्यात दाटीवाटीने 16 बैल भरले असल्याचे दिसून आले.
Previous Articleआर्थिक व्यवहारातून तरुणास बेदम मारहाण, दोघांना अटक
Next Article बेपत्ता इसमाचा मृतदेह कृष्णा पात्रात आढळला









