प्रतिनिधी / चिपळूण
ग्रामपंचायत निवडणुकीला रंग चढत असतानाच सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱया दिवशी उमेदवारांसह समर्थकानी गर्दी केली होती. मात्र बीएसएनएलची सेवा सकाळपासून खंडित झाल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे कोर्ट फी स्टम्पचा तुटवडा जाणवला. त्यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला.
तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून पहील्या दोन दिवसांत अवघे पाच अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर पुढील तीन दिवस सलग सुट्टी आल्यानंतर सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली. सोमवारी उमेदवारी अर्जासह इतर कागदपत्रांवर लागत असलेली कोर्ट फी स्टॅम्प उपलब्ध नसल्याने सकाळी 11 वाजल्यापासूनच ऑनलाईन अर्ज भरणाऱया उमेदवारांची धावाधाव सुरू झाली होती. दुपारी तर कुठेच उपलब्ध होत नसल्याने एकच गोंधळ उडाला. उमेदवार व त्यांच्या समर्थकानी अधिकाऱयांकडे विचारणा करण्यास सुरूवात केली. मात्र तांत्रिक अडचणीमुळे ट्रेझरीमधूनच उपलब्ध होत नसल्याचे उत्तर देण्यात आले.
आमदार शेखर निकम यांना हा विषय समजताच त्यांनी तत्काळ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनीही वरिष्ठ अधिकाऱयांशी संपर्प साधल्यानंतर दुपारी 3 वाजल्यानंतर तिकिटे मिळण्यास सुरूवात झाली. यासाठी प्रतिज्ञापत्र देण्यासाठीचा कालावधीही तहसीलदार सूर्यवंशी यांनी वाढवून दिला. त्यामुळे सायंकाळीं 6 वाजल्यानंतरही सेतू कार्यालयासमोर गर्दी दिसून येत होती.
Previous Articleकारचा टायर फुटून झालेल्या अपघातात वृध्दा जागीच ठार, पाच जखमी
Next Article कोकण किनारपट्टीला मत्स्य टंचाईच्या झळा!









