प्रतिनिधी/ चिपळूण
शहरात दिवसेंदिवस वाढणाऱया अतिक्रमणावर ऐन दिवाळीत नगर परिषदेने सोमवारी जेसीबी फिरवत ‘फटाका’ लावला. यामुळे सर्व परिसर मोकळे झाले आहेत. या कारवाईला विरोध करण्यासाठी व्यावसायिक माजी नगरसेवकाने खोक्याच्या छतावर, तर त्याच्या मुलाने इमारतीवर चढून आत्महत्त्येचा प्रयत्न केला. असे असताना या घटना घडताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शहराला अतिक्रमणाचा शाप लागला आहे. त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी नगर परिषदेने वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र त्याला तितकेसे यश आलेले नाही. कारण अतिक्रमण करणाऱयांना राजकीय वरदस्त मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे सध्या शहरातील भोगाळे, कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल, चिंचनाका, भाजीमंडई, पानगल्ली, पॉवरहाऊस, बहाद्दूरशेखनाक्यासह बाजारपेठेतील रस्ते अशा विक्रेत्यांनी काबीज केले आहेत. यामुळे वाहने चालवणे सोडाच, चालणेही कठीण बनले आहे. सध्या दिवाळी सण सुरू असल्याने या अतिक्रमणात कमालीची वाढ झाली होती.
असे असतानाच मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, नगर अभियंता परेश पवार, राजू खातू, वैभव निवाते, संदेश टोपरे, बापू साडविलकर, अमित महाडिक, विनायक सावंत, संतोष शिंदे आदींच्या पथकाने जेसीबी, वाहने व कर्मचाऱयांच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली. शिवनदी येथील माजी नगरसेवक रमेश खळे यांच्या साईकृपा वडापाव, पेमाचा चहा येथे हे पथक कारवाईसाठी आले असता एकच गोंधळ उडाला. त्यांच्या मुलाने कारवाईला सुरूवात होताच त्यास विरोध करत लगतच्या इमारतीवर धावत जात आत्महत्तेचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर काही वेळातच खळे यांनी पोलिसांच्या समक्ष आपल्या दुकानाच्या खोक्याला शिडी लावून छतावर चढत, जोपर्यंत कारवाई थांबवत नाहीत तोपर्यंत खाली न उतरता आत्महत्त्या करण्याचा इशारा दिला. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. काही नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींनी येथे येत खळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तर नगर परिषदेला आजच कारवाई करण्याची आठवण का झाली अशी विचारणा केली. त्यामुळे वातावरण तापले. मात्र पोलीस केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून आले.
वीज पुरवठा खंडित
खळे ज्या खोक्यावर चढले तेथच विजेचा खांब असून उच्च दाबची वाहिनी गेली आहे. त्यामुळे गडबडीत त्यांचा हात तारेला लागण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे महावितरणला कळवून परिसरातील वीजपुरवठा तत्काळ खंडित करण्यात आला. खळे हे अनेक तास उन्हातच खोक्याच्या छतावर उभे होते. त्यामुळे तेवढे तास वीजपुरवठाही खंडित ठेवण्यात आला होता.
खळेंना शांत करण्यासाठी मोर्चा अन्य भागाकडे
खळे हे छतावरून उतरत नसल्याने त्यांना शांत करण्यासाठी कारवाई करणाऱया पथकाने आपला मोर्चा भोगाळेकडे वळवला. काही तासात येथील अतिक्रमणाचा सुपडा साफ करत त्यानंतर अन्य भागातील अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता पथक पुन्हा खळेंच्या अतिक्रमणाठिकाणी आले. त्यावेळी खळे तेथे उपस्थित नव्हते. मात्र त्यांच्या मुलाने आपण स्वत:हून अतिक्रमण काढून घेत असल्याचे सांगून त्या कामास सुरूवात केली. ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तोपर्यंत कारवाई करणारे पथक व पोलीस येथे तैनात होते.
उद्घाटनानंतर काही तासातच कारवाई
खळे यांचे साईकृपा वडापाव सेंटर 1992 पासून आहे. सोमवारी त्यांनी ‘पेमाचा चहा’ हा नवा स्टॉल सुरू केला. मात्र हे करताना त्यांनी चहाच्या स्टॉलसह वडापावच्या गाडीला लाखो रूपये खर्च करून नवा लूक दिला. मात्र असे असताना उद्घाटनानंतर काही तासातच नगर परिषदेने त्याला जमिनदोस्त केले.
राजकारण्यांना प्रेमाचा चहा पण…
खळे यांच्या प्रेमाचा चहा या नव्या व्यावसायाचे उद्घाटन करण्यासाठी खुद्द आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी एकत्र प्रेमाचा चहाही घेतला. असे असताना अचानक झालेल्या कारवाईमागे नेमके राजकारण काय हे कोडे उशिरापर्यंत कोणालाही समजून आले नाही.
पोलिसांची अशीही कारवाई
खळे यांच्या गाडय़ांवर कारवाई करताना लोकप्रतिनिधींसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहीजण रस्त्यावरच दुचाकी उभ्या करून कारवाईच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे वाहतूक पोलीस या सर्वांवर दंडाची कारवाई करून त्यांच्याकडे परवान्याची मागणी करीत होते.
मी व्यावसायिकांच्या पाठीशी-खेराडे
याबाबत बोलताना नगराध्यक्षा खेराडे यांनी गेल्या आठ महिन्यापासून कोरोनाच्या परिस्थितीमुळे शहरातील छोटे व्यावसायिक व खोकेधारक त्रस्त आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना प्रशासनाने कारवाईसाठी ही वेळ साधायला नको होती. अत्यंत चुकीच्या वेळी प्रशासनाने ही कारवाई केली असून त्यांनी खडस शॉपिंग मॉल सारख्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून दाखवावी असे सूचवताना आपण व्यावसायिकांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.
वरून किर्तन, आतून तमाशा-शिंदे
याबाबत बोलताना काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे यांनी खळे यांच्या प्रेमाचा चहा या नव्या व्यावसायाचा शुभारंभ करणाऱया नगराध्यक्षांवर निशाना साधताना त्यांची वागणूक ही वरून किर्तन, आतून तमाशा असल्यासारखी असल्याच्<ााr टिका केली.









