वादळाच्या शक्यतेने दाखवली सज्जता, महसूलनेही नेमली पथके
प्रतिनिधी/ चिपळूण
शहरात दाखल झालेल्या एनडीआरएफच्या जवानांनी मंगळवारी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत विविध प्रात्यक्षिके सादर केली. यातून त्यांनी आपली सज्जता दाखवली असून महसूलनेही आपली पथके नेमली आहेत.
देशाच्या पश्चिम समुद्रात वादळाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असल्याने जिल्हय़ाच्या सुरक्षिततेसाठी पुणे येथून एनडीआरएफची एक तुकडी येथे दाखल झाली आहे. सर्व यंत्रसामुग्रीसह 26 जवान येथे आले असून त्यांनी जिल्हय़ाचा आराखडाही तयार केला आहे. या तुकडीकडे सर्वप्रकारच्या मशिनरी, बोट, कटर, रोप आदी यंत्रसामुग्री आहे. त्यामुळे मंगळवारी तहसीलदार सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली. या वादळाच्या पार्श्वभूमीवर सूर्यवंशी यांनीही महसूलची पथके तयार केली असून ती विविध भागात तैनात ठेवण्यात येणार आहेत.
येथे प्रात्यक्षिके केल्यानंतर हे जवान दापोली, गुहागर आदी तालुक्यांत गेले. तेथेही प्रात्यक्षिके करण्यात आली. हे जवान चिपळुणातच राहणार असून जिल्हय़ात कोठे वादळाचा तडाखा जाणवल्यास ते तत्काळ जाणार आहेत. या वादळाच्या भीतीने बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी बाजारपेठेत येऊ नये, असाल त्याचठिकाणी स्वत:ची काळजी घ्यावी व कोठेही काही घडल्यास त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला द्यावी, असे आवाहन तहसीलदार सूर्यवंशी यांनी केले आहे.









