असुर्डे-निर्मळवाडीतील घटना : आईसह दोन मुलांचा समावेश : मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट : दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ
चिपळूण
तालुक्यातील असुर्डे धरणालगत लाकडे गोळा करण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. यात आईसह दोन शाळकरी मुलांचा समावेश आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेची सावर्डे पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या तिघांचा बुडून मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मयुरी बाबाराम चोगले (35), श्रध्दा बाबाराम चोगले (16), हर्ष बाबाराम चोगले (12, तिघेही असुर्डे-निर्मळवाडी) अशी बुडून मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी, श्रध्दा तर हर्ष हे तिघेजण मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास असुर्डे धरणालगतच्या जंगलमय परिसरात लाकडे आणण्यासाठी गेले होते. मात्र उशीर झाला तरी ते पुन्हा घरी परतली नाहीत. यामुळे त्याच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण असुर्डे परिसरात त्यांनी पिंजून काढला. ही शोधमोहीम सुरु असतानाच बुधवारी पहाटे 3 च्या सुमारास या तिघांचे मृतदेह असुर्डे धरणात आढळून आले.
मृत्यूचे कारण अस्पष्ट
या तिघांचा बुडून मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा, हे स्पष्ट झालेले नाही. असे असले तरी पोलिसांनी व्यक्त केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, आई मयुरी व बहीण श्रध्दा या दोघी धरण परिसरात लाकडे गोळा करीत होत्या. याच दरम्यान हर्ष धरणात आंघोळ करण्यासाठी उतरला असावा. त्याने आपले कपडे व चप्पल धरणाच्या किनाऱयावरील एका दगडावर ठेवले होते. हर्ष बुडू लागल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याची आई मयुरी तसेच मोठी बहीण श्रध्दा हिने धरणात उडी घेतली असावी व एकमेकांना वाचवताना तिघांचाही बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अदाज आहे. कारण मयुरी यांनी जमा केलेली लाकडीची मोळीदेखील घटनास्थळी पडलेली आहे. तसेच त्या मोळी ठिकाणी त्याची एक चप्पल, तर दुसरी चप्पल धरणाच्या पाण्यात सापडली आहे. तसेच श्रध्दाच्या चप्पला धरणाच्या किनाऱयावर आढळून आल्या आहेत.
दरम्यान, श्रध्दा ही आंबतखोल विद्यालयात इयत्ता 9वी, तर हर्ष हा असुर्डे जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 5वीत शिक्षण घेत होता. येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शिपाई पदावर कार्यरत असणारे बाबाराम हरु चोगले यांचे हे कुटुंब आहे. बाबाराम हे मंगळवारी दिवसभर शिक्षण विभागात काम करीत होते. ते सायंकाळी घरी गेल्यानंतर त्याच्या अन्य दोन जुळय़ा मुलींनी आई व भावंडे धरणाकडे लाकडे गोळा करण्यास गेल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. ग्रामस्थांनीही रात्रभर शोधमोहीम सुरू केली.
रात्रीच्या शोधमोहिमेनंतर पहाटेच्या सुमारास हर्षचा मृतदेह पाण्यावर आला. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने अन्य दोन मृतदेहही पाण्यावर आले. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली. कुटुंबातील तिघांचेही मृतदेह पाहून बाबाराम यांना धक्काच बसला. घटनेची माहिती सावर्डे पोलीस स्थानकात दिल्यानंतर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱयांनी धाव घेऊन पंचनामा केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास वाघमारे यांनीही भेट देऊन माहिती घेतली. सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.









