प्रॅन्चायझी चालवण्याचे दाखवले होते आमिष
चिपळूण /
पॅन्चायझी चालवण्यास देण्याचे आमिष देऊन त्यासाठी 10 लाख रुपये देऊन ती चालवण्यास न देता यातूनच एकाची 10 लाख रूपयांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शबाना अबरार परकार व अबरार हमीद परकार (काविळतळी-चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबत राजकुमार भवरलाल छाजेड (57, मुरादपूर-भोईवाडी) यांनी येथील पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार, शबाना व अबरार परकार यांनी संगनमताने 24 ऑगस्ट 2018 ते 24 डिसेंबर 2019 दरम्यान पॅन्चायझी देण्याचे आमिष छाजेड यांना दाखवले होते. त्यानुसार त्यांनी छाजेड यांच्याकडून 10 लाख रुपयाची मागणी केली होती. त्याप्रमाणे छाजेड यांनी शबाना व अबरार परकार यांना 9 लाख रुपये तसेच 1 लाख आर.टी.जी.एस.ने असे एकूण 10 लाख रुपये दिले. मात्र त्या बदल्यात छाजेड यांना पॅन्चायझी चालवण्यास दिलेली नाही. याबरोबरच छाजेड यांना 10 लाख रुपयेही दिले नाहीत. त्यानुसार शबाना व अबरार परकार यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.









