कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना, नव्या नऊजणांच्या संपर्कात तब्बल 100 जण
प्रतिनिधी/ चिपळूण
तालुक्यात गुरूवारी तीन आरोग्य कर्मचाऱयांसह नऊजणांना कोरोनाची बाधा झाल्याने ते रहात असलेल्या इमारती, गावातील वाडय़ा शुक्रवारी आयासोलेट करण्यात आल्या आहेत. साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने ही उपाययोजना केली आहे. तसेच त्याच्या संपर्कात तब्बल 100जण आल्याचे पुढे आल्याने त्यांचे नमुने घेण्यास सुरूवात झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी लागण झालेल्या शहरातील फार्मासिस्ट, त्याची शिक्षक पत्नी, मुलगी, नातेवाईक व मेडिकलमधील दोन कर्मचारी तरूणी बऱया झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दरदिवशी कोरानाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्या तालुक्याचा 158वर गेला आहे. या रूग्णांमध्ये आरोग्य विभाग्<ााचे कर्मचारी, नगर परिषदेची नर्स, आशासेविका सापडल्याने प्रशासन हादरले आहे. गुरूवारी सापडलेल्यांमध्ये खेर्डी-माळेवाडी, बहाद्दूरशेखनाका, पागमळय़ातील एकता अर्पाटमेंट, महालक्ष्मी रेसिडेन्सी, पागनाका, कोंढे-बौद्धवाडी, मुरादपूर येथील रूग्णांचा समावेश असल्याने या इमारती, गावातील वाडय़ा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या सूचनेप्रमाणे तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी आयसोलेट केल्या आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचारी, आशासेविका, अंगणवाडी कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.
तसेच मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते हे आरोग्य विभागातील कर्मचाऱयांच्या माध्यमातून शहरासह रूग्ण सापडलेल्या इमारतींमध्ये फवारणी करीत आहेत. नगर परिषदेची नर्स सापडल्याने शुक्रवारी दवाखाना स्वच्छ करून येथेही फवारणी करण्यात आली आहे. गुरूवारी सापडलेल्या रूग्णांच्या संपर्कात 100जण आल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे त्यांचे नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या तालुक्याचा आकडा 158वर गेला आहे. यातील 94जण बरे झाले असून 58जणांवर पेढांबे येथील कोविड सेंटर व कामथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. आयसोलेट असलेल्या भागातील नागरिक इतरठिकाणी फिरू नयेत यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एका फार्मासिस्टसह त्याच्या शिक्षक पत्नी, मुलगी, नातेवाईक व मेडिकलमधील दोन तरूणींना कोरोना झाल्यानंतर त्याची साखळी वाढत गेली. यातूनच गोवळकोट रोड येथील अल हाजी इमारतीतील 31जण बाधित झाले, तर याच भागात राहणाऱया अन्य तिघांनाही कोरोना झाला आहे. त्यामुळे हा भाग आजही बंद आहे. असे असतानाच फार्मासिस्ट, त्याची शिक्षक पत्नी, मुलगी, नातेवाईक व मेडिकलमधील दोन कर्मचारी तरूणी बऱया झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या या भागात एकही नवा रूग्ण सापडलेला नाही ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे.









