प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पारपत्र सेवा केंद्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पारपत्रासंबंधी अनेक प्रकारची फसवणूक होत असल्याचे भारतात दिसून आले आहे. अनेकदा गुन्हेगार आणि फसवणूक करणारे लोक बनावट पारपत्र तयार करून विदेशात पळून जातात. परंतु आगामी काळात आता असे घडणार नाही. इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरसोबत मिळून केंद्र सरकार चिपयुक्त ई-पासपोर्ट निर्मितीसाठी काम करत आहे. ई-पासपोर्टमुळे प्रवास दस्तऐवजाची सुरक्षा लक्षणीय प्रमाणात वाढणार आहे.
ई-पासपोर्ट निर्मितीसाठी खरेदी प्रक्रिया सुरू असून ती वेगवान करण्याचे प्रयत्न चालू आहेत. देशातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्याची योजना आहे. आतापर्यंत 488 लोकसभा मतदारसंघांमध्ये पारपत्र सेवाकेंद्र सुरू करण्यात आले आहे. ही प्रक्रिया गतिमान करण्याच्या हालचाली सुरू होत्या, परंतु कोविड-19 संसर्गामुळे ही प्रक्रिया सद्यकाळात रखडल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले आहे.
विदेशमंत्र्यांनी पारपत्र सेवा दिनानिमित्त देश-विदेशात पारपत्र कार्यालयांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना संकटकाळातही या सर्वांनी पूर्ण जबाबदारीने काम केल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
ई-पासपोर्टच्या मदतीने बनावटगिरी रोखण्यास मदत होणार आहे. तसेच विदेशात असताना भारतीयांना मदत मिळविणे सोपे ठरणार आहे.









