शाओमी, वनप्लस, ओप्पोची कार्यालये निशाण्यावर : मुंबई, दिल्ली, एनसीआर, बेंगळूरसह 15 ठिकाणी कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्राप्तिकर विभागाने (आयटी) बुधवारी देशभरातील चिनी मोबाईल कंपन्या शाओमी, वनप्लस आणि ओप्पो यांच्या कार्यालयांवर आणि संबंधित संस्थांवर छापे टाकले. करचुकवेगिरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये चिनी मोबाईल कंपन्यांशी संबंधित संस्थांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांकडून देण्यात आली. या छाप्यांमध्ये प्राप्तिकर विभागाच्या हाती अनेक महत्त्वाचे दस्तावेज लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चिनी मोबाईल कंपनी ओप्पोच्या डझनभर कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. वार्षिक अहवालात खर्च अधिक दाखवून कोटय़वधी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचा कंपनीवर आरोप आहे. बुधवारी सकाळपासूनच बेंगळूर, मुंबई, दिल्ली, गुडगाव, रेवाडीमध्ये छापे टाकण्यात आले. प्रसारमाध्यमांनुसार, प्राप्तिकर विभागाने ओप्पोच्या अनेक मॅन्युफॅक्चरिंग युनिट, कॉर्पोरेट कार्यालये आणि चिनी कंपन्यांच्या गोदामांवर छापेमारी केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरू ठेवतानाच शोधमोहीम आणि कागदपत्रांची तपासणी केली जात होती.
सकाळी ग्रेटर नोएडामध्ये ‘ओप्पो’चे कार्यालय उघडल्यानंतर थोडय़ाच वेळात, 11 च्या सुमारास आयकर विभागाचे पथक पोहोचले. यावेळी कार्यालयाबाहेर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तपास पथकाने सर्व कर्मचाऱयांना कार्यालयातून बाहेर पडण्यास बंदी घातली होती. याचदरम्यान कंपनी कर्मचारी-अधिकाऱयांच्या उपस्थितीत प्राप्तिकर अधिकाऱयांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली होती. ओप्पो कंपनी करचुकवेगिरी करत स्थानिक लोकांना रोजगार देत असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार ठिकठिकाणी कारवाईचा धडाका लावण्यात आला. यापूर्वी उत्तर प्रदेशातील ओप्पोच्या काही कार्यालयांमध्ये प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. ऑगस्ट महिन्यात चिनी कंपनी झेडटीएफ कंपनीवर छापे टाकले होते. ही छापेमारी गुरूग्राममध्ये झाली होती.