‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संभ्रम : लोहखनिज नेण्यासाठी दाखल : रेडीवासीयांमध्ये धाकधूक
मंगळवारी रात्री जहाज पोहोचले बंदरात
जहाजावरील 22 पैकी बहुतांश कर्मचारी चिनी
स्थानिक सीमाशुल्कने सर्वांना केले सतर्क
योग्य मास्कअभावी जहाज तपासणीस विलंब
जहाजावरील कर्मचाऱयांची वैद्यकीय तपासणी
शेखर सामंत / सिंधुदुर्ग :
‘करोना’ व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीनमधून येणारी जहाजे, विमाने व प्रवाशांबाबतीत देशभर अतिदक्षता बाळगली जात असतानाच रेडी येथील लोह खनिज नेण्यासाठी चीन येथून निघालेले ‘नाथन ब्रॅन्डॉन’ हे 55 हजार मेट्रीक टन क्षमतेचे सिंगापूरचे महाकाय जहाज 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री रेडी बंदरात दाखल झाल्याने प्रशासकीय यंत्रणा हायअलर्ट झाली आहे. दरम्यान स्थानिक सीमाशुल्क विभागाने या आगमनाची गांभीर्याने दखल घेतली असून रेडी पोर्टसह रेडी ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींना याबाबत सतर्क केले आहे. रेडी पोर्टनेही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्याची माहिती हाती आली आहे.
चीनमधील अनेकांचे बळी घेणाऱया ‘करोना’ व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रेडी येथील लोहखनिज नेण्यासाठी चीनमधून निघालेले महाकाय जहाज रेडी बंदरात पोहोचले. मंगळवारी रात्री जेव्हा हे जहाज रेडी बंदरात पोहोचले तेव्हा स्थानिक सीमाशुल्क म्हणजेच ‘कस्टम यंत्रणा’, त्याचप्रमाणे ‘पोर्ट यंत्रणा’ खडबडून जागी झाली. त्यानंतर करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोणकोणत्या खबरदारी घ्याव्या लागतील, याबाबत माहिती घेण्यास व तशा पद्धतीच्या उपाययोजना करण्यास सुरुवातही झाली.
चिनी कर्मचाऱयांसह जहाजावर 22 कर्मचारी
स्थानिक सीमाशुल्क विभागाला सदर जहाजावरून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्या जहाजावर कॅप्टनसह 22 कर्मचारी असल्याचे निश्चित झाले. हे जहाज चार महिन्यांपूर्वीच म्हणजेच करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच चीन येथून निघाल्याचेही स्पष्ट झाले. मात्र प्राप्त झालेल्या अधिक माहितीनुसार या 22 कर्मचाऱयांपैकी बहुतांश चिनी कर्मचारी हे महिनाभरापूर्वीच या बोटीवर दाखल झाल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे सर्वप्रथम स्थानिक सीमाशुल्क यंत्रणा सावध झाली. कारण बंदरात दाखल झालेल्या या जहाजाची तपासणी करण्याचे पहिले काम हे सीमाशुल्क विभागाचे असते. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर या जहाजाची तपासणी करण्याकरीता या सीमाशुल्क विभागाकडून रेडी बंदर व्यवस्थापनाकडे मेडिकल प्रोटोकॉलची मागणी करण्यात आली. मात्र या पोर्टकडून पुरवण्यात आलेले मास्क हे साधे असल्याने व करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ‘के. एन. 95’ हा विशेष मास्कच वापरण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दिले असल्यामुळे पहिले दोन दिवस स्थानिक सीमाशुल्क विभागाने या जहाजाची तपासणी टाळली. मात्र त्यानंतर गुरुवारी हे विशेष मास्क व डॉक्टरसह वैद्यकीय पथक सोबत मिळाल्यानंतर सीमाशुल्कच्या अधिकाऱयांनी या जहाजाची तपासणी मोहीम हाती घेतली. सीमाशुल्क अधीक्षक अभिजित भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक दिनेशकुमार मिना, हवालदार नीलेश गंगावणे, निकोलस फर्नांडिस आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. जगताप यांच्या पथकाने ही तपासणी हाती घेतली. जहाजावरील सर्व कर्मचाऱयांची या वैद्यकीय पथकाने तपासणी केली. तर सीमाशुल्क अधिकाऱयांनी जहाजांवरील कर्मचाऱयांच्या कागदपत्रांसोबत संपूर्ण जहाजाची तपासणी केली.
जहाजावरील कर्मचाऱयांचे बॉडी टेंप्रेचर नॉर्मल
या जहाजावर चढण्यापूर्वी सदर जहाजावरील कर्मचाऱयांच्या मागील दोन दिवसांपासूनच्या शरीर तापमानाच्या लॉकबूकची माहिती घेतली असता त्यामध्ये जहाजांवरील कर्मचाऱयांचे बॉडी टेम्प्रेचर नॉर्मल असल्याचे आढळून आल्याचे समजते. मात्र या लॉकबूकवर विश्वास किती ठेवायचा, हा प्रश्न आल्यानंतर आवश्यक त्या खबरदारीच्या सर्व उपाययोजना करूनच सीमाशुल्कच्या तपासणी पथकाने जहाजावर प्रवेश केला व जहाजावरील सर्व कर्मचाऱयांची तपासणी केली. या तपासणीचा अहवाल मात्र अद्याप प्राप्त झालेला नाही.
सर्वप्रकारची काळजी घेऊन इतरांनाही केले सावध – अधीक्षक भिसे
दरम्यान या जहाज आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सीमाशुल्क विभागाच्या वेंगुर्ले विभागाचे अधीक्षक अभिजित भिसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या रेडी पोर्टवर दाखल झालेल्या ‘नाथन ब्रॅन्डॉन’ जहाजाच्या पार्श्वभूमीवर करोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारा मेडिकल प्रोटोकॉल देण्यासंदर्भात आमच्या विभागातर्फे रेडी पोर्ट लिमिटेडला अगोदरच निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार रेडी पोर्ट लिमिटेडने कार्यवाही सुरू केली आहे. बोटीवर बोर्डिंग करताना सीमाशुल्क अधिकाऱयांसह स्टीव्हडोअरींग स्टाफ, बार्ज स्टाफ यांना देखील करोना व्हायरससंदर्भात योग्य ती काळजी घेण्याबाबत आमच्या विभागातर्फे मार्गदर्शन करण्यात आल्याचेही ते म्हणाले. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व सरपंच यांच्याशी देखील संपर्क साधून या करोना संदर्भात स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती करा, असे आवाहन केले आहे. त्यानुसार या स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपण रेडी पोर्टला सर्वोतोपरी मदत करू, अशी ग्वाही दिल्याचेही त्यांनी सांगितले.
करोनाबाबत गावात जनजागृती हवीच – चित्रा कनयाळकर
दरम्यान चिनी कर्मचाऱयांचा समावेश असलेल्या या विदेशी जहाजाबाबत चिंता व्यक्त करताना रेडी येथील पं. स. माजी सदस्या चित्रा कनयाळकर म्हणाल्या, या जहाजावर लोहखनिज भरण्याचे काम हे गावातील स्थानिक कामगारच करीत असतात. ही माणसे सामान्य असल्यामुळे तसेच ग्रामस्थांना करोना व्हायरसबद्दल कसलीच कल्पना नसल्यामुळे ही कामगिरी पार पाडताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, याची माहिती त्यांना नसणार आणि तशाच परिस्थितीत रोजगाराच्या आशेने हे कर्मचारी त्या जहाजावर गेले आणि त्यांच्या दुर्देवाने त्यांना करोनाची लागण झाली, तर त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो आणि त्यांच्या माध्यमातून हा व्हायरस रेडी गावातही पसरू शकतो. अगोदरच या गावात म्हणाव्या तशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने याबाबत संबंधित बंदर विभाग व स्थानिक प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. या जहाजावर करोनाची लागण नसली, तर काम करायला ठीक आहे. अन्यथा कुठल्याही प्रकारची खबरदारीची उपाययोजना केल्याशिवाय स्थानिक कामगारांनी जहाजावर जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन त्यांनी केले.









