ऑनलाईन टीम / बीजिंग :
जगातील प्रत्येक देश कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झाला असून, अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ढासळल्या. मात्र, 2021 मध्ये कोरोनासह अनेक आव्हाने असूनही चीनच्या अर्थव्यवस्थेत 8.1 टक्क्यांनी वाढ झाली असून, ती 18 ट्रिलियन डॉलरवर पोहचली आहे, असे चीन सरकारने सोमवारी सांगितले.
नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने आज जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था 4 टक्क्यांनी वाढली असून, तिसऱ्या तिमाहीत ती 4.9 टक्क्यांपेक्षा कमी असू शकते. परंतु 2021 मध्ये एकूण विकासदर 8.1 टक्क्यांपर्यंत वाढला. सरकारने वर्षासाठी निर्धारित केलेल्या सहा टक्क्यांपेक्षा ही वाढ जास्त आहे.
खासगी क्षेत्रातील गुंतवणूक 7 टक्क्यांनी वाढली
सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये चीनच्या स्थिर मालमत्तेच्या गुंतवणुकीत 4.9 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी रिअल इस्टेट गुंतवणूक 54.45 ट्रिलियन युआन (सुमारे 8.56 ट्रिलियन डॉलर्स) पेक्षा जास्त होती, असे एनबीएसने म्हटले आहे. खासगी क्षेत्रांनी केलेली गुंतवणूक गेल्या वर्षी 7 टक्क्यांनी वाढून सुमारे 30.77 ट्रिलियन युआन झाली आहे, असे आकडेवारीवरून दिसून येते. 2021 मध्ये चीनच्या ग्राहकोपयोगी वस्तूंची किरकोळ विक्री 12.5 टक्के झाली.









