भारतीय सीमेवर पीएलएकडून शस्त्रास्त्रांची जमवाजमव
वृत्तसंस्था/ बीजिंग
भारत आणि अमेरिकेसोबत तणावाच्या स्थितीदरम्यान चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीला (पीएलए) चिनी नवर्षाच्या सुटीदरम्यान युद्धासाठी तयार राहण्याचा निर्देश दिला आहे. माहिती युद्धकौशल्यासाठी सैन्याने तयार रहावे. हे कौशल्य शत्रूच्या सैन्यावर विजयासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे क्षी यांनी म्हटले आहे. चिनी अध्यक्षाने हे विधान भारत आणि तैवान यांच्यासोबत सुरू असलेला तणाव पाहता केल्याचे तेथील प्रसारमाध्यमे आणि तज्ञांचे मानणे आहे.
चिनी सैन्य भारताला लागून असलेल्या सीमेवर शस्त्रास्त्रांची जमवाजमव करत असल्याचे चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. याचबरोबर चीनचे सेंट्रल मिलिट्री कमिशन पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांना निर्देश देत असून रसदपुरवठय़ावर देखरेख ठेवत आहे.
तयारी वाढवावी लागणार
वसंत महोत्सवादरम्यान पूर्ण सैन्याला स्वतःची युद्धसज्जता वाढवावी लागणार असल्याचे जिनपिंग यांनी स्वतःच्या संदेशात म्हटले आहे. चिनी दिनदर्शिकेनुसार वसंत महोत्सवात कोटय़वधी लोक स्वतःच्या घरी परततात. सरकारी विभाग तसेच मंत्रालयांमधील कामकाजाला सुटी असते.
सीमेवर तोफा तैनात
भारत आणि चीन यांच्या सैन्यादरम्यान चर्चेच्या अनेक फेऱया पार पडूनही या वादावर तोडगा निघू शकलेला नाही. क्षी जिनपिंग यांच्या संदेशानुसार चिनी सैन्याला 155 एमएमची होवित्झर तोफ मिळाली आहे. याचबरोबर युद्धात वापरले जाणारे वाहन आणि टाइप 15 रणगाडेही पुरविण्यात आले आहेत. चीनने स्वतःची सर्वात घातक तोफ पीसीएल-181 भारतीय सीमेवर तैनात केली आहे.









