नव्या अंतराळस्थानकाबाहेर पहिल्यांदाच स्पेसवॉक
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनच्या दोन अंतराळवीरांनी रविवारी पहिल्यांदा अंतराळात चीनकडून निर्माणाधीन नव्या अंतराळ स्थानकाबाहेर पडून स्पेसवॉक केला आहे. त्यांनी हे यशस्वी स्पेसवॉक एका 15 मीटर लांबीचा रोबोटिक आर्म तयार करण्याचे काम पूर्ण करण्यासाठी केले आहे. चिनी अंतराळवीर लियू बोमिंग आणि टैंग होंगबो यांना चीनच्या शासकीय वृत्तवाहिनीकडून अंतराळाच्या एअरलॉकबाहेर पडताना दाखविण्यात आले आहे.
या पथकातील तिसरे सदस्य आणि कमांडर नी हैशेंग अंतराळयानात राहूनच या स्पेसवॉकचे निरीक्षण करत होते. हे अंतराळवीर 17 जून रोजी अंतराळमोहिमेसाठी रवाना झाले होते. अंतराळातील ही मोहीम चीनच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ कार्यक्रमाचा हिस्सा आहे. यांतर्गतच मे महिन्यात मंगळ ग्रहावर रोबोट रोव्हर उतरविण्यात आला होता.
चीनकडून अंतराळ स्थानकाचे पहिले मॉडय़ूल तियानहे किंवा हेवनली हार्मनी 29 एप्रिल रोजी लाँच करण्यात आले होते. लियू, नी आणि टैंग 17 जून रोजी शेनझोऊ कॅप्सूनमधून पोहोचले. अंतराळवीरांच्या स्पेससूटला गरज भासल्यास 6 तासांपर्यंत अंतराळाच्या पोकळीत काम करता येईल अशाप्रकारे डिझाइन करण्यात आले आहे.
चीनची अंतराळ संस्था पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत 70 टनाच्या स्थानकात आणखीन दाने मॉडय़ूल जोडण्यासाठी एकूण 11 मोहिमा राबविण्याची योजना आखत आहे. लियू यांनी 2008 मध्ये शेनझोऊ-7 मोहिमेद्वारे यापूर्वीच अनुभव प्राप्त केला होता. तर नी हे अंतराळातील स्वतःच्या तिसऱया मोहिमेवर आहेत, तर लियू पहिल्यांदाच अंतराळात पोहोचले आहेत. हे सर्वजण सैन्य वैमानिक आहेत.









