नवी दिल्ली
एअरसेल मॅक्सिस प्रकरणात दिल्ली न्यायालयाने माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम आणि इतर संशयित आरोपींना समन्स बजावले आहे. याप्रकरणी तपास यंत्रणांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने हे समन्स पाठवले आहे. न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला आहे. आरोपपत्रात नमूद केलेल्या सर्व आरोपींना 20 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहावे लागेल. तपास यंत्रणांनी या प्रकरणातील अनेक व्यक्ती आणि कंपन्यांवर आरोप केले आहेत. सदर घोटाळय़ात चिदंबरम व त्यांचे पुत्र कार्ती हे आरोपी आहेत. सीबीआय व अंमलबजावणी संचालनालय या दोन्ही तपास संस्था त्यांची चौकशी करीत आहेत. आयएनएक्स मीडिया कंपनीला विदेशात बेकायदेशीररित्या मोठय़ा प्रमाणात भांडवल उभारणीची अनुमती चिदंबरम यांनी अर्थमंत्री या नात्याने अधिकाराचा गैरवापर केला असा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच त्यांचे पुत्र कार्ती यांनी याप्रकरणी मध्यस्थी केली असा आरोप कार्ती यांच्यावर आहे.









