जागतिक कोरोना महामारीमुळे समोर आलेली टाळेबंदी, ठप्प झालेली सिने इंडस्ट्री यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर काम करणाऱया कामगार, तंत्रज्ञ, ज्युनियर कलाकार यांची उपासमार चालू झाली. याचवेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने या सर्वांना आर्थिक वा अन्नधान्य किराणा कीट यास्वरुपात मदत सुरू केली. आतापावेतो 2 हजार 500 सभासदांपर्यंत ही मदत अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक व गावोगावच्या समिती सदस्यांमार्फत पोचवली गेली आहे.
महामंडळाची सभासद संख्या लक्षात घेऊन त्यातील गरजू सभासदांना नाव नोंदणी करण्यास सांगण्यात आले असता आतापर्यंत 6000 पेक्षा जास्त सभासदांनी नाव नोंदणी केली आहे. या सर्व सभासदांना मदत करता यावी यासाठी अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पदाधिकारी आणि संचालकांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि बॉलीवूड स्टार्सना मदतीचे आवाहन केले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अभिनेत्री माधुरी दीक्षित धावून आली आणि तिने चित्रपट महामंडळाला भरघोस मदत केली आहे व त्यामार्फत आपल्या व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ व कलावंतांचे दु:ख काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच तिने इतर कलावंतांना चित्रपट महामंडळाला मदत करण्याचे आवाहनही केले आहे.









