नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच देशात येत्या 1 ऑक्टोबरपासून अनलॉक-5 ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अनलॉक-4 अंतर्गत देशातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारने अनेक नियम शिथिल केले होते. आतादेखील सरकारकडून अनलॉक-5 अंतर्गत आणखी काही नियम शिथिल होऊ शकतात. विशेषतः सिनेमागृहांना 50 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीसह अनुमती दिली जाणार असल्याचे संकेत सरकारी सूत्रांकडून सोमवारी मिळाले. तसेच देशात आता मोठय़ा प्रमाणात सणांना सुरूवात होत असल्यामुळे कोरोना नियमांच्या चौकटीत मंदिरांसह धार्मिक स्थळांना परवानगी दिली जाऊ शकते.
भारतात राष्ट्रव्यापी अनलॉकचा चौथा टप्पा 30 सप्टेंबरला संपत आहे. 1 सप्टेंबरला सुरू झालेल्या अनलॉक-4 मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासोबतच इतर विविध ठिकाणी सूट दिली होती. यासोबतच नववी ते 12 वी पर्यंतच्या शाळा अंशत: सुरू करण्यात आल्या. दरम्यान, अनलॉक-4 ची मुदत संपत आल्यामुळे आता केंद्रीय गृह मंत्रालय अनलॉक-5 संबंधी नवी नियमावली जाहीर करणार आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया अनलॉक-5 मध्ये कोणकोणत्या सेवा-सुविधा सुरू होणार यासंबंधीची माहिती गृह मंत्रालय जारी करणार आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अनेक नियम शिथिल करत 1 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांना परवानगी दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून देशातही 50 टक्केपेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत नाटक, यात्रा, चित्रपटगृह तसेच सर्व संगीताच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यावेळी सुधारित नियमावलीनुसार सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर यासह सरकारद्वारे घालून देण्यात आलेल्या सर्व अटी-नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
चित्रपटगृहे : अनलॉक-4 अंतर्गत मॉल, सलून, रेस्तरॉ, व्यायमशाळा यांसारख्या सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क सुरु करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आता चित्रपटगृहांना सरकारकडून परवानगी मिळू शकते. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने चित्रपटगृह सुरु करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी मागणी अनेकदा केली आहे.
पर्यटन : कोरोनामुळे देशातील पर्यटन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे अनलॉक-5 अंतर्गत पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासंदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्मयता आहे. ताजमहालसह काही पर्यटनस्थळे पुन्हा सुरू झाल्याने काही प्रमाणात व्यवसाय सुरू झाले. गृह मंत्रालय आणखीही पर्यटन स्थळे उघडण्याची परवानगी देऊ शकते. कोरोना संसर्गामुळे पर्यटन व्यवसायाला सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे.
शाळा : देशात नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाचे अधिकार सरकारने शाळांवर सोपवले आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती पाहून शालेय शिक्षण विभाग यासंबंधी निर्णय घेणार आहे. मात्र, प्राथमिक वर्ग पुढील महिन्यांसाठीही बंद राहण्याची शक्मयता आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग होत नसले तरीही ऑनलाईन शिक्षण सुरूच राहील. देशभरात काही ठिकाणी शाळा-महाविद्यालये सुरू झाली आहेत.









