पुणे
विख्यात चित्रकार आणि येथील ‘कला निकेतन’चे माजी प्रिन्सिपॉल मारुती पाटील यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक शंतनु देशपांडे आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते झाले. भांडारकर इन्स्टिटय़ूट रस्त्यावरील रिव्हिएर येथील ‘आर्ट टुडे’ या गॅलरीत सुरू झालेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे, ‘तरुण भारत’चे समूह संपादक किरण ठाकुर तसेच अन्य चित्रकार आणि चित्रप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनात मारुती पाटील यांची प्रामुख्याने जलरंगातील तसेच अनेक तैलचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.
चित्रकार मारुती पाटील तसेच रवी परांजपे हे दोघेही बेळगावचे कलामहषी के. बी. कुलकर्णी यांचेच शिष्य. पाटील यांच्या चित्रावर के. बी. कुलकर्णी यांची छाप दिसते.
याप्रसंगी किरण ठाकुर यांनी पाटील यांच्या कलाकृतींची प्रशंसा केली. त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात 4 तारखेपासून के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी समारोह बेळगावात भव्य प्रमाणात साजरा होणार असल्याचे नमूद केले. याच निमित्ताने बेळगावच्या वरेरकर नाटय़संघाच्या इमारतीमध्ये के. बी. कुलकर्णी यांच्या नावे एक सुसज्ज अशी आर्ट गॅलरी सुरू करणार असल्याचेही किरण ठाकुर यांनी सांगितले.
हे प्रदर्शन सकाळी 11 ते 7 या वेळेत 12 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे.









