ऑनलाईन टीम / पुणे :
चित्रकाराने चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची गरज असते. चित्रकलेतील कौशल्ये विकसित करण्यासाठी कल्पनाशक्ती, सतत नवीन शोध घेण्याची दृष्टी, सातत्यपूर्ण सराव आणि परिश्रम घेण्याची तयारी आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार खलिल खान यांनी व्यक्त केले.
‘पुणे चित्रकार कट्ट्याच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘स्वच्छ पुणे’ आणि ‘वाहतूक पुणे’ या विषयांवर आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खलिल खान प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.
खलिल खान पुढे म्हणाले, ‘सोशल मीडियामधून संदर्भ घेऊन चित्र काढण्याकडे आजकाल मुलांचा कल दिसून येतो. कलाशिक्षकांनी या बाबीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्यास प्रवृत्त करुन कला गुण विकसित केले पाहिजेत.’
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, शिवसेना संपर्क प्रमुख सुनील कदम, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, संदीप मोरे, तृष्णा विश्वासराव यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धेत एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. निवडक ३२५ चित्रांचे बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन मांडण्यात आले होते.