वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टय़ुनेशिया येथे सुरू असलेल्या 2021 च्या विश्व युवा टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या युवा टेबल टेनिसपटू दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांनी 19 वर्षाखालील मुलींच्या गटातील दुहेरीत आपले पदक निश्चत केले. तसेच एकेरीच्या विभागात त्यांनी बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे.
महाराष्ट्राच्या चितळे आणि घोष या महिला टेबल टेनिसपटूंनी टय़ुनेशियातील स्पर्धेत 19 वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत टय़ुनेशियाच्या गार्सी आणि झोगलेमी यांचा 11-5, 6-11, 11-9, 11-8 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. चितळे आणि घोष यांना दुहेरीच्या पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. आता उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी चितळे आणि घोष यांचासामना झेकची झाडेरोव्हा आणि क्रोएशियाची ऍरापोव्हिक यांच्याबरोबर होणार आहे.
या स्पर्धेत मुलींच्या 19 वर्षाखालील वयोगटात एकेरीत मुंबईच्या चितळे आणि घोष यांनी शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले आहे. दिया चितळेने पहिल्या फेरीतील सामन्यात बेलारूसच्या व्हॅसेलिंनकाचा 11-5, 11-7, 11-7 त्यानंतर दुसऱया सामन्यात झाडेरोव्हाचा 11-4, 10-12, 11-1, 11-8, तिसऱया सामन्यात अल्जेरियाच्या सिडेकीचा 11-3, 11-4, 11-7 असा पराभव केला. स्वस्तिका घोषने पहिल्या सामन्यात ग्रीसच्या पॅपेडिमिट्रोयुचा 11-6, 11-6, 11-9, दुसऱया सामन्यात पोर्तुगालच्या मँटोसचा 8-11, 11-6, 11-5, 8-11, 11-7 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. या स्पर्धेत मुलांच्या विभागात भारताच्या प्रियेश राज सुरेश आणि पायस जैन तसेच दिप्ती पाटील यांचे आव्हान समाप्त झाले आहे.









