प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील चिखर्डे या गावातील तळ्यामध्ये विविध प्रकारची घाण साचत असून या घाणीमुळे हा तलाव आता एक रोगराईचे केंद्र बनत चालला आहे. या तलावाच्या पाण्यावरती दूषित तवंग आला असून यामुळे दुर्गंधी पसरत आहे. सायंकाळ व सकाळच्या सुमारास या तलावाच्या आजूबाजूला दुर्गंधी पसरून रोगराईला निमंत्रण मिळत आहे तसेच या तलावांमध्ये गावातील शेतकरी आपली पशुधन धुत असून यापासून पशु धनास या घाणीचा संसर्ग होत आहे.
गावाच्या कल्याणासाठी निर्माण झालेले गावतळे आता गावाच्या जीवावर उठलेले चित्र पाहायला मिळत आहे. हा प्रकार गंभीर असला तरी याकडे मात्र चिखर्डे ग्रामपंचायत हेतुपुरस्पर पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे येथील गावकऱ्यांनी तरुण भारत संवादला सांगितले.
सविस्तर वृत्त असे की, बार्शीत पासून पंधरा किलोमीटर वरती चिखर्डे हे गाव आहे. चिखर्डे हे गाव असले तरी आकाराने आणि लोकसंख्येच्या मानाने खूप मोठे आहे. बार्शी तालुक्यातील चिखर्डे हे गाव महत्त्वाचे समजले जाते याच गावाच्या मध्यभागी एक गाव तळे आहे. या गावातल्यामुळे गावातील सर्व विहीर, बोअर इत्यादींना जलस्रोत निर्माण झाला आहे. हे गावतळे म्हणजे गावकऱ्यांसाठी एक वरदान आजपर्यंत ठरलेले आहे. या तळ्यावरती रोज महिलांची कपडे धुण्यासाठी तर शेतकऱ्यांची आपली पशु धुण्यासाठी गर्दी असते.
विविध प्रकारे या गावातील पाण्याचा उपयोग या गावातील गावकरी करत असतात. मात्र आता या गाव तळ्यातील पाणी दुषित होण्यास सुरुवात झाली आहे. याला कारण म्हणजे या गावातील असणारे चिकन, मटण दुकान व मासे विक्रीचे दुकाने तसेच गावातील या तळ्यात टाकत असलेला कचरा. गावातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी चिकन, मटन व मासे विक्रीचे प्रमाण जास्त आहे. ही दैनंदिन विक्री झाल्यानंतर त्या ठिकाणी राहिलेली घाण हे दुकानदार या तलावात टाकत असल्याचे चित्र आहे. तर अनेक जण निघालेला कचरा सुद्धा याच तलावात टाकत आहेत.
त्यामुळे या सर्व कचरा व घाणी चे रूपांतर दुर्गंधी मध्ये होऊन त्यापासून आता पाणी दुषित होण्यास सुरुवात झाली असून गावतळे आता एक रोगराई केंद्र बनले आहे. या गोष्टीकडे चिखर्डे ग्रामपंचायत राजरोसपणे दुर्लक्ष करीत असून आता नागरिकांच्या जिवावर बेतणारी तळ्यातील घाण साफ करणे व परत या तळ्यात घाण साचू न देणे हा विषय महत्त्वाचा आहे.









