जिह्यात 32 नवे रुग्ण : बुवाची सौंदत्ती येथे आणखी 16 जणांना कोरोना : रुग्णसंख्या वाढतीच
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीचा फैलाव वाढतो आहे. गुरुवारी जिह्यातील आणखी 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यामध्ये बुवाची सौंदत्ती (ता. रायबाग) येथील 16 जणांचा समावेश आहे. 7 ते 16 वर्षे वयाच्या 11 मुलांना कोरोनाची लागण झाली असून चिकोडी येथील एका 62 वषीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
चालू वषी कोरोनामुळे सरकारी व खासगी इस्पितळात अनेकांचा मृत्यू झाला असला तरी एचआर सिटी अहवालावरून त्यांचे निदान झाले होते. त्यामुळे सरकारी अहवालात त्याची नोंद नव्हती. गुरुवारी जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये चिकोडी येथील वृद्धाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या वर्षातील अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला हा पहिला मृत्यू आहे.
मृतांचा आकडा 343 वर पोहोचला असून जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 269 इतकी झाली आहे. त्यापैकी 26 हजार 724 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 199 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. अद्याप 2 हजार 349 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. जिह्यातील इतर तालुक्मयांतही रुग्णसंख्या वाढती आहे.
गुरुवारी बेळगाव शहर व तालुक्मयातील दहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रामतीर्थनगर, हनुमाननगर, राणी चन्नम्मानगर, कुवेंपूनगर, हिंडाल्को कॉलनी, अमननगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून नाझर कॅम्प, वडगाव येथील एकाच कुटुंबातील तिघा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहर व उपनगरांतही रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. गुरुवारी बुवाची सौंदत्ती येथील 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जिह्यातील 7 ते 16 वयोगटातील 11 मुलांचा समावेश आहे. खानापूर, अंकलगी, उगरगोळ, रामदुर्ग, सुरेबान येथेही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अद्याप 25 हजार 915 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. आरोग्य विभागाने तपासणी वाढविली आहे.









