शुभ मुहूर्तावर खरेदीला उधाण : दिव्यांचा लखलखाट, ओवाळणी, खरेदीचा साधला मुहूर्त
वार्ताहर/ निपाणी, चिकोडी
भारतीय संस्कृतीची देणगी अशी ओळख असणारा, दिव्यांच्या लखलखाटात प्रकाशमय जीवनाची दिशा देणारा, ओवाळणीतून नातेसंबंध दृढ करणारा असा दीपावली सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. या सणानिमित्त एकाच दिवशी आलेला पाडवा, भाऊबीज साजरा करताना उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
लक्ष्मी पूजनाचा पारंपरिक उत्सव साजरा होताच एक दिवसाच्या अंतराने येणाऱया दीपावली पाडवा व भाऊबीजचे सर्वांनाच वेध लागले होते. पहाटे रांगोळय़ा रेखाटल्या होत्या. दीपोत्सव साजरा करताना ओवाळणीची परंपरा जोपासण्यात आली. गोड फराळावर ताव मारून अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी करताना आनंद साजरा केला. पै-पाहुण्यांसह, मित्र परिवारांना फराळाचे डबे, भेटवस्तू देत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यानंतर साडेतीन मुहूर्तापैकी असणारा मुहूर्त साधत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.
कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पाऊस यामुळे व्यथित झालेल्या भीतीच्या छायेतून नातेसंबंधात निर्माण झालेली दरी दूर करण्याचे काम या दीपावळी सणाने केले. प्रकाशाची दिशा देणारा हा उत्सव साजरा करताना गेल्या आठ महिन्यांत निर्माण झालेला अंधार दूर झाला. व्यावसायिक उलाढालीत आलेली मरगळही दूर झाल्याने सर्वत्र उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.
सामाजिक माध्यमांद्वारेही भाऊबीजेच्या शुभेच्छा
दीपावली सणातील शेवटचा दिवस म्हणजेच बहीण-भावाच्या अतुट नात्याची परंपरा जोपासणारा भाऊबीज सण चिकोडी, निपाणी परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच विविध सामाजिक माध्यमांद्वारेही भाऊबीजेच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सोमवारी चिकोडी शहरात पहाटेपासूनच बाजारपेठेतील सर्व दुकानदारांनी लक्ष्मी-सरस्वती व वहीपूजन केले. दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर व्यापारी वर्गाने वहीपूजनाची परंपरा अबाधित राखत येणाऱया ग्राहकांना मिठाईसह पेढय़ाचा प्रसाद देण्याबरोबरच काही व्यापाऱयांनी भेटवस्तूही देण्यावर भर दिल्याचे पहावयास मिळाले.
चिकोडी शहरातील दुचाकी वाहन विक्रेत्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विविध कंपन्यांच्या दुचाकी विक्रेत्यांद्वारे कोटय़वधी रुपयांची उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले. चिकोडीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करण्यासाठी विविध ज्वेलरी दुकानात ग्राहकांची गर्दी झाल्याचेही पहावयास मिळाले. कपडे, किराणा, फराळ विक्रेते, बेकरी आदी व्यापाऱयांनाही सोमवारचा दिवस तेजीदायक ठरला आहे. एकंदरीत चिकोडी शहरातील दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेतील रविवार व सोमवारी तेजीत रुपांतर झाल्याने सर्वच व्यापाऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.









