प्रतिनिधी/ चिकोडी
कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर असल्याने व त्याच्या संसर्गाचा दुष्परिणाम चिकोडी शहरातील नागरिकांवर होऊ नये यासाठी नगरसभेने कोरोनामुक्त शहराचा ध्यास घेतला आहे. शहरात कोरोनाचे नियंत्रण होण्यासाठी विविध कठोर निर्णय व कोरोना निर्बंध लसीकरणाची वेगळी मोहीम शहरात राबविण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य, महसूल व नगरसभेचे सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवक प्रयत्न करीत आहेत.
चिकोडी शहरात 23 वार्ड व 23 नगरसेवक आहेत. शहराची लोकसंख्या सुमारे 40 हजारा’वर असून सर्वांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. गेल्या वषीही चिकोडी शहरात सरकारच्या नियमावली पेक्षाही कडक नियमावली लागू करण्यात आली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळाले होते. यंदाही सरकारी नियमांपेक्षा अधिकच कडक नियम पाळण्यात येत असल्याने संसर्गाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. नगरसभेच्या प्रत्येक वार्डात जाऊन कोरोना निर्बंधक लसीकरण देण्याचा राज्यात प्रथमच उपक्रम राबविण्यात आला आहे. नगरसभेच्या 23 पैकी सुमारे 20 वार्डात लसीकरण अभियान यशस्वी राबविण्यात आले आहे.
नगरपालिकेच्या आवारातच प्रथम लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. सकाळी दहा ते दोनपर्यंत दुसरी लस व दुपारी तीन नंतर पाचपर्यंत पहिल्या टप्प्यातील नागरिकांना लस दिली आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी नगरसभेचे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी घरोघरी फिरून करपत्राचे वितरण करून जागृती करीत आहेत. नगरसभा कार्यक्षेत्रामध्ये भाजीपाला विक्रीसाठी विशेष ओळखपत्र देऊन गाडय़ाच्या माध्यमातून घरोघरी फिरून भाजीपाला विक्रीची सोय करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिकांनी स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्याचा घेतलेला निर्णय यशस्वी ठरत आहे. विविध उपक्रमांमुळे कोरोना नियंत्रणासाठी सर्वांचे सहकार्य उपयुक्त ठरत आहे. नगरसभा कार्यक्षेत्रामध्ये दुचाकी वाहन घेऊन अनावश्यक फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. विविध गावाहून जोडणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून रोखण्यात आले आहेत. शहरात रोज विनामास्क फिरणाऱयांकडून दंड आकारून तसेच त्यांना मास्क वापरण्याचे ताकीद दिली जात आहे. सरकारच्या वेळोवेळी येणाऱ्या आदेशांची तातडीने अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील सर्व वार्डात रस्त्यांची स्वच्छता करुन सॅनियाझरींग करण्यात येत आहे. गटारीची स्वच्छता करून किटकनाशक पावडरची फवारणी करण्यात येत आहे. नगरसभा, महसूल व आरोग्य खात्याच्या सर्वांच्या सहयोगामुळे कोरोना नियंत्रणासाठीचा उपक्रम येथे यशस्वी ठरत आहे.
24 मे पर्यंत राहणार कडक निर्बध
कोरोनामुक्त चिकोडी शहर निर्माण करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. राज्यात प्रथमच वार्ड निहाय कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम चिकोडी शहरात राबविण्यात आली आहे. शहरातील सर्व वॉर्डांमध्ये फिरून लसीकरण करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. आवश्यक सेवा वगळता शहरातील सर्व व्यवहार नागरिकांच्या चर्चेनंतरच बंद करण्यात आले आहेत. 24 मे अखेरपर्यंत कडेकोट काटेकोरपणे लॉकडाऊन पाळला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी दिली.









