वार्ताहर/ चिकोडी :
पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनीही पत्रकारांना लॉकडाऊन काळात सर्वांनी सहकार्य करावे, अशी सूचना दिली आहे. असे असताना चिकोडी येथील डीएसपी मनोजकुमार नायक यांनी पत्रकाराला अर्वाच्य शिवीगाळ करीत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची दखल घ्यावी यासाठी तहसीलदारांतर्फे मुख्यमंत्र्यांना डीएसपींवर कारवाई करण्यासाठी कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, गुरुवारी सकाळी 11 वाजता चिकोडीत आपल्या घरातून कार्यालयाकडे जात असताना एका पत्रकारास बसवेश्वर सर्कलमध्ये आल्यानंतर डीएसपी मनोजकुमार नायक यांनी त्याची दुचाकी अडविली. त्यावेळी सदर पत्रकाराने आपण पत्रकार असल्याचे सांगून ओळखपत्रही दाखविले. तसेच वृत्तांकनासाठी आपण जात असल्याचे सांगितले. असे असतानाही पदाची धुंदी डोक्यात घुसलेल्या डीएसपींनी तुम्ही पत्रकार म्हणजे काय प्रधानमंत्री आहात का? असे म्हणत शिवीगाळ केली.
सदर घटनेची माहिती मिळताच कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघातर्फे बैठक घेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच संबंधित डीएसपींवर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. भारतात सर्वत्र कोरोना रोगाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होत आहे. प्रत्येकजण या रोगापासून सुटका करुन घेण्यासाठी घरी बसून आहेत. पण पत्रकार सामाजिक सेवेचे भान ठेवून स्वत:च्या व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता बातमी संकलनासाठी बाहेर पडत आहेत. समाजात घडणाऱया प्रत्येक घडामोडीसह कोरोनाबाबत जागृती करीत असताना डीएसपी मनोजकुमार नायक यांनी पत्रकारांना शिवीगाळ करणे योग्य नाही.
जोपर्यंत याबाबत ठोस पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत चिकोडीतील एकही पत्रकार शासकीय व राजकीय कार्यक्रमाला हजर राहणार नाही. सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचे निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. सदर निवेदन चिकोडी विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी तहसीलदार सुभाष संपगावी यांना देऊन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे पाठविण्याची विनंती केली.
तहसीलदार सुभाष संपगावी यांनी सदर निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी विरुपाक्षी कवटगी, सुभाष दलाल, संजय कांबळे, राजू संकेश्वरे, काशिनाथ सुळकुडे, सदाशिव जाधव, डी. के. उप्पार, मुस्ताक पिरजादे, सुशांत जमखंडीकर, सुनील तराळ, उत्तम काटकर, गुरुनाथ हिरेमठ, उत्तम शिंदे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.









