ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
केरळ विमान अपघातात मृत्यू पावलेल्या 19 जणांपैकी 2 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बचाव आणि मदत कार्य करणाऱ्यांना आता कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार आहे.
दुबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाला शुक्रवारी रात्री केरळमधील कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला होता. या अपघातात वैमानिकासह 19 जणांचा मृत्यू झाला. तर 123 जण जखमी झाले आहेत. मृतांपैकी 2 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने आता चिंता वाढली आहे. बचाव आणि मदत कार्य करणाऱ्या सर्वांनाच आता कोरोना चाचणी करावी लागणार आहे. केरळ सरकारमधील मंत्री ए. सी. मोइद्दीन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
एअर इंडियाचे AXB-1344 हे विमान 191 प्रवाशांना घेऊन दुबईहून कोझीकोडला येत होते. शुक्रवारी रात्री 7.41 च्या सुमारास कोझिकोडच्या करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना पावसामुळे हे विमान धावपट्टीवरून घसरले. दरम्यान, हे विमान 35 फूट खड्ड्यात गेले आणि विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानात 174 प्रवासी, दहा लहान मुले, दोन वैमानिक आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता.









