प्रतिनिधी /काणकोण
मागच्या जवळजवळ सहा महिन्यांपासून बंद असलेला चावडी, काणकोण येथील आठवडय़ाचा बाजार 9 पासून अंशतः सुरू झालेला असून बाजारात खरेदीसाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती.
आठवडय़ाच्या बाजाराला येणारे बहुतेक विक्रेते बेळगाव, हुबळी या भागांतून येत असतात. कोरोनाच्या वाढता प्रभावामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून विद्यमान पालिका मंडळाने आठवडय़ाच्या बाजारावर निर्बंध आणले होते. रस्त्याच्या बाजूला बसून फळ-भाजी विकून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱया विक्रेत्यांना देखील पालिकेने मनाई केली होती. मात्र 9 रोजी पूर्वीसारखे रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसणारे विक्रेते आणि ज्या ठिकाणी आठवडय़ाचा बाजार पूर्वी भरायचा त्या ठिकाणी काही विक्रेत्यांचे झालेले आगमन पाहून काही जागरूक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.
काणकोण तालुक्यात दरदिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली असताना आठवडय़ाचा बाजार सुरू करायला इतक्यात परवानगी द्यायला नको होती. सद्या अंशतः सुरू झालेल्या या बाजारात पुढील आठवडय़ांत अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केल्या. यासंबंधी नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.









