बेंगळूर/प्रतिनिधी
देशातील नागरिकांना स्वस्त दरात औषधे मिळावी यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान चालू आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये (१२ जानेवारी २०२१ पर्यंतच्या) देशातील सर्व जिल्ह्यांमधील दर्जेदार जेनेरिक औषधे विकल्या जाणाऱ्या ७०६४ प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रांमधे ४८४ कोटी रुपयांच्या औषधांच्या विक्रीची नोंद झाली. मागील आथिर्क वर्षाच्या तत्सम आकडेवारीपेक्षा हा आकडा ६० टक्क्यांनी अधिक आहे, त्यामुळे भारतीय नागरिकांच्या खर्चात अंदाजे ३ हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांनी आज कर्नाटकात ही घोषणा केली.
सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात भारत सरकारने जन औषधी केंद्रासाठी ३५.५१ कोटी रुपये निधी दिला होता, त्यामुळे नागरिकांची २६०० कोटी रुपयांची बचत झाली. अशाप्रकारे सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे नागरिकांचे प्रत्येकी ७४ रुपये वाचले. त्यामुळे त्यांचा फायदा झाला आहे, असेही गौडा म्हणाले.
देशभरातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी पाऊल टाकत आजपर्यंत जन औषधी केंद्रात सुविधा सॅनिटरी पॅड प्रत्येकी १ रुपया या प्रमाणे १० कोटीपेक्षा जास्त पॅड तेथे विकले गेले आहेत. जन औषधीच्या सुविधा सॅनिटरी पॅड खरेदीसाठीची ३.६ कोटी रुपयांची ऑर्डर डिसेंबर २०२० मध्ये दिली आहे. तसेच जन औषधीच्या सुविधा सॅनिटरी पॅड खरेदीसाठीची ३० कोटी रुपयांची निविदाही फिक्स करण्यात आली आहे.
कर्नाटक विषयी बोलताना गौडा यांनी सध्या कर्नाटकात ७८८ प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्रे परवडणारी, उच्च-गुणवत्तेची जेनेरिक औषधे देऊन नागरिकांची सेवा करीत आहेत. मार्च २०२१ पर्यंत राज्यात एकूण ८०० पीएमबीजेके सुरू करण्याचे कर्नाटकाचे लक्ष्य आहे. वैद्यकीय क्षेत्रातील औषधोपचारांसह आरोग्य क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी करत कर्नाटकमधील पीएमबीजेपी केंद्रांचे मार्च, २०२१ पर्यंत १२५ कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट आहे