प्रतिनिधी / खेड
ठाणे मुंबईतून चालत गावी येणाऱ्या तालुक्यातील वरची हुंबरी येथील सदाशिव भिकू कदम ( ५८ ) यांचा महाड तालुक्यातील विन्हेरेनजीक जंगलात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याच ठिकाणी विन्हेरे व वरची हुंबरी गावातील मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. नोकरीनिमित्ताने ते ठाणे येथे वास्तव्यास होते. लॉकडाऊनमुळे ४ मे रोजी ते गावी येण्यासाठी पायी प्रवासाला निघाले. ६ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्नीस संपर्क साधून सायंकाळपर्यंत घरी येतो असे सांगितले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल नॉट रिचेबलच लागत होता. विन्हेरे – सुतारवाडी नजीकच्या जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेल्या महिलांना शनिवारी त्यांचा मृतदेह दिसून आला.
याबाबत महिलांनी पोलीस पाटील व सरपंच यांना कळवले. त्यांनी कशेडी घाटाला पर्याय असलेल्या विन्हेरे मार्गावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांशी संपर्क साधून मृतदेहाबाबत कल्पना दिली. मृतदेह कुचलेल्या व प्राण्यांनी खाल्लेल्या अवस्थेत आढळल्याने सुरुवातीला त्यांची ओळख पटत नव्हती. त्यांच्या खिशातील ओळखपत्रावर ओळख पटल्यानंतर येथील पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेबाबत कळवले. पोलीस व वरची हुंबरीतील १० ते १२ ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. मृतदेहाची अवस्था पाहून त्याचठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी सायंकाळच्या सुमारास तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली असा परिवार आहे .








