गोडोली / प्रतिनिधी
वाहनांने वेग मर्यादा ओलांडली, सीट बेल्ट न लावल्यास, विनापरवाना काचांना फिल्मींग लावल्यास, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होते. चालत्या वाहनांनी नियमांचे उल्लंघन केलेले तब्बल ३०० मीटर अंतरावरून टिपून थेट वाहनांच्या रेकॉर्डवर नोंद करणारी अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ दाखल झाली असून जिल्हाभर नियमितपणे ती कार्यरत राहणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना दिली.
अतिवेग आणि वाढते अपघात नियंत्रित करण्यासाठी राज्यभरात प्रत्येक प्रादेशिक परिवहन विभागात अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ दाखल झाल्या आहेत. चालत्या वाहनांने नियमांचे उल्लंघन केले की ते आता या व्हेईकल मधील अत्याधुनिक कॅमेऱ्यात कैद होणार आहे. पोलीस विभागाकडून परवानगी न घेता केलेल्या काळ्या फिल्मींग वाहनांवर ही कडक दंडात्मक कारवाई रेकॉर्डवर येणार आहे. त्यासाठी फिल्मींग तपासणीची स्वतंत्र मशीनचं या व्हेईकलमध्ये आहे. नव्याने जिल्ह्यासाठी अशी व्हेईकल सातारच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात दाखल झाली असून सर्व वाहन निरीक्षकांना परिपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे. तब्बल ३०० मीटर पर्यंतच्या अंतरातील चालत्या वाहनानी केलेल्या नियमांचे उल्लंघन कॅमेऱ्यात टिपून वाहनांच्या रेकॉर्डवर येणार असल्याने देशभरात कुठेही ते दिसणार आहे.
सध्या देशभरात विविध कारणांमुळे रस्ते अपघात वाढत असून यात मरण पावणाऱ्यांची वाढती संख्या चिंताजनक आहे.वाहन चालकाने दारु घेतली असल्यास त्याची तपासणी होणार असून ते ही आता रेकॉर्डवर येणार आहे. शासनाने प्रत्येक वाहने नियमांचे उल्लंघन केले की कारवाई करण्यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज अशा ‘इंटरसेप्टर व्हेईकल’ प्रत्येक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला उपलब्ध करून दिल्या आहे.राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रस्त्याच्या कडेला हि व्हेईकल थांबून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून कार्यवाही करणार आहे.
कॅमेऱ्यात टिपले की रेकॉर्डवर येणार
नवी व्हेईकल नियमितपणे जिल्हाभरात कधीही कुठेही राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्य बजावणार आहे. यात आधुनिक सुसज्ज संगणकीय यंत्रणा असून ती हाताळण्यासाठी वाहन निरीक्षकांना परिपूर्ण प्रशिक्षण दिले आहे.त्यामुळे नियमांचे उल्लंघन केलेले कॅमेऱ्यात टिपले की तत्काळ ऑनलाईन दंड वाहनाच्या रेकॉर्डवर नोंद होणार आहे.