वार्ताहर / मालवण:
रांगोळी महाराज आश्रम येथे पर्यटकांच्या चालत्या लक्झरीला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही पर्यटकाला दुखापत झाली नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने लक्झरीला लागलेली आग विझविण्यात आली.
सांगली येथील पर्यटकांचा ग्रुप पर्यटनासाठी मंगळवारी लक्झरीने मालवण येथे आला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सांगलीतील पर्यटकांची लक्झरी बस तारकर्लीहून मालवण बाजारपेठेच्या दिशेने जात होती. वायरी येथून लक्झरी जात असताना लक्झरीच्या पाठीमागील बाजूने धूर येऊ लागल्याचे लक्झरीच्या पाठीमागून येणाऱया एसटीच्या चालकाने व दुचाकीस्वारांनी पाहिले. त्यांनी रांगोळी महाराज आश्रम येथे पर्यटकांची लक्झरी बस तात्काळ थांबवली. लक्झरी थांबवल्यावर लक्झरीच्या पाठीमागील भागास आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर प्रसंगावधान राखून लक्झरीतील पर्यटकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. स्थानिक नागरिक अमित सावंत यांनी आग विझविण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. सुदैवाने या दुर्घटनेत पर्यटकांना दुखापत झाली नाही.









