डिमार्ट ते सातारा जाणाऱया सर्व्हिस रोडवरील घटना
प्रतिनिधी/ सातारा
डिमार्ट ते सातारा जाणाऱया सर्व्हिस रोडवर दुचाकीवरून जगदाळे दाम्पत्य निघाले होते. यावेळी दोन अनोळखी इसम दुचाकीवरून त्यांच्याजवळ गेले आणि गळ्यातील 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. याप्रकरणी राजश्री जगदाळे (वय 37, रा. म्हसवे सातारा) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजश्री जगदाळे आणि पती सुरेश दुचाकीवरून निघाले होते. यावेळी डिमार्ट ते सातारा जाणाऱया सर्व्हिस रोडवर ते आले. त्यांच्या पाठीमागे आणखी एक दुचाकी होती. त्यावर दोन अनोळखी इसम बसले होते. अवघ्या काही वेळात या इसमांनी त्यांची दुचाकी राजश्री यांच्या दुचाकीजवळ नेली. हे पाहून दोघेही गेंधळून गेले. याचा फायदा घेत या इसमांनी राजश्री यांच्या गळ्यावर हात मारून मंगळसुत्र ओढले. या झटापटीत मंगळसुत्र तुटले. मंगळसुत्राचा काही भाग घेऊन इसमांनी पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोघेही घाबरले. झगदाळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास पोलीस हवालदार परिहार करत आहेत.








