सध्याच्या काळात सर्वसामान्य माणूस भ्रमित असून त्याला सत्य असत्यातला फरक समजत नाही. त्याचा शोध घेत लेखकाने उच्चरवाने सत्य सांगितलेच पाहिजे असे मत उदगीर येथे होणाऱया 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्यासारखा वैविध्यपूर्ण लेखन करणारा लेखक अध्यक्ष झाला याबद्दल सासणेजींचे अभिनंदन केलेच पाहिजे. त्याचवेळी मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चालता-बोलता असला पाहिजे या कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कौतिकपूर्ण वक्तव्याचे त्यांनी प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष समर्थन केले म्हणून म्हणा विरोधही झाला पाहिजे. मराठीकडे इतर भाषेतील साहित्यिक आशा लावून पहात आहेत असे ज्यांना वाटते आणि मराठी वैश्विक व्हावी अशी ज्यांची अपेक्षा आहे त्यांनी अशा संकुचित विचारांना पाठीशी घालणे गैरच. ठाले-पाटील यांच्या वक्तव्यातील सत्य काय ते मराठी साहित्याची आणि साहित्यिकांची गरजेपुरती जाण असणारेही जाणतात! त्यांचा रोख कोणत्या दिशेने होत आहे हेही लक्षात येते. वैचारिकदृष्टय़ा जागृत असणारे मराठवाडय़ातील साहित्यप्रेमी आज ना उद्या याबद्दल जाब विचारतील अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. हे सर्वच जण जाणतात की, ठाले-पाटील यांनी नाशिक संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्याविषयी हे वक्तव्य केले आहे. त्यांचा रोख फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावरही असू शकतो. संमेलनाध्यक्ष चालता-बोलता असला पाहिजे, असे म्हणून ठाले-पाटील कोणाचा अपमान करत आहेत? वैश्विक भाषा आणि ज्ञानभाषा होऊ पाहणाऱया अभिजात मराठी भाषेतील साहित्यिकांच्या प्रातिनिधिक संस्थेचे ते प्रमुख पदाधिकारी आहेत. म्हणजे त्यांची दृष्टी व्यापक असावी अशी साधारण अपेक्षा असण्यास हरकत नसावी. पण ठाले-पाटील यांना फक्त पाया पुरतेच दिसत असेल तर मग ते चुकीच्या ठिकाणी उभे आहेत किंवा चुकीच्या ठिकाणी त्यांना बसवले आहे, याचा विचार साहित्य संस्थांनी आणि त्याच्या प्रतिनिधींनी करायची वेळ आली आहे. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चालता-बोलता असावा म्हणजे केवळ गरजेपुरती उपस्थिती लावणाराच हवा का? आणि त्याने ठाले-पाटील यांच्यासारख्या व्यक्तींच्या म्हणण्याला “मम” म्हणण्यापूरतीच त्याची गरज असावी का? हे उघड सत्य आहे की, नाशिकच्या साहित्य संमेलनात जो काही राजकीय चढाओढीचा प्रयत्न झाला त्यामुळे नारळीकर यांनी या संमेलनाकडे फिरकणे टाळले असावे. कोरोनाच्या परिस्थितीवर मात करुन एक आनंदोत्सव होत असताना तशी किंवा संमेलनाध्यक्षांनीच बहिष्कार टाकला अशी चर्चा नको म्हणून बहुतांश जणांनी ती टाळली. अर्थात काही मंडळींना जावेद अख्तर सुद्धा या संमेलनाच्या विचारपीठावर नको होते. यावरून संमेलनांची विचारदिशा आपल्याला हवी तशीच असावी हे ठरवणारी एक सदोषदृष्टीची यंत्रणा याठिकाणी एकमेकांच्या तंगडय़ात तंगडय़ा घालण्याचे काम करत होती हे स्पष्ट होते. अशावेळी नारळीकर यांच्यासारख्या व्यक्तीने त्या वादात न पडणे पसंत करणे योग्य ठरते. तसेही भूमिका घेण्याचे बहुतांश सारस्वतांना वावडे आहेच. पण, ठाले-पाटलांना नारळीकर यांच्या न येण्याची मिरची लागली आणि त्यांनी असे दुर्दैवी विधान केले. त्याहून दुर्दैवाने सासणे यांसारख्या व्यक्तीने त्याचे समर्थनही केले. हे मान्यच आहे की, घुमानपासून सात वर्षे सासणे यांचे नाव केवळ चर्चेत होते आणि या संमेलनात त्यांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे आपल्या काळात अशा प्रकारचा कोणता वाद होऊ नये असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मग लेखकाने सांगायचे आणि मान्य करायचे जे सत्य आहे, त्याचे काय? अध्यक्ष चालता-बोलता हवा असे म्हणणारे ठाले-पाटील आणि इतर संस्थांचे प्रतिनिधी एकत्रच बसून अध्यक्ष ठरवतात. तेव्हा मग ते याचा विचार करत नाहीत का? का त्यावेळी साहित्य संस्था, प्रकाशक, राजकीय विचार, आपला-परका आणि कोटा इतकेच विचार केले जातात? ठाले-पाटलांना अपेक्षित असणारा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष चालता-बोलता हवा, की त्यांना हवा तसा भरकटता हवा? जाणता अध्यक्ष कोणालाच नको आहे काय? सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे, चालता-बोलता व्यक्तीच मराठीला पुढे घेऊन जाणार आहे असे जर ठाले-पाटील यांच्यासारख्या मराठी साहित्य संस्थेच्या धुरीणाला वाटत असेल तर मराठी कधीही वैश्विक विचार करू शकणार नाही. कारण, जगाच्या उत्पत्तीचा विचार करणाऱया स्टीफन हॉकिंग्जवर ठाले-पाटील यांच्यासारखा व्यक्ती थेट अन्याय करत आहे! संपूर्ण जग हॉकिंग्ज यांच्या जगाच्या निर्मितीचे गूढ उकलण्याच्या कार्यातील योगदानाबद्दल ऋण व्यक्त करते. ते स्टिफन हॉकिंग्ज ना चालते होते-ना बोलते होते! त्या तशा शारिरीक अवस्थेतही त्यांनी जगाला पुढे नेणारे संशोधन केले. मग अमृतातेही पैजा जिंकणाऱया मराठीच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष अंथरुणाला खिळून जरी चांगला विचार देऊ शकत असेल तर त्याबाबत ठाले-पाटलांना वाईट वाटण्याचे कारण काय? बोलका भावला आणि चालता, फिरता व्यक्ती पदावर असणे अपेक्षित आहे की, जाणत्या व्यक्तीने मराठी सारस्वताला विचार देणे अपेक्षित आहे? साहित्य संस्थांच्या समारंभाची शोभा वाढवणारा व्यक्ती, इतक्मया मर्यादित अर्थानेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाकडे बघितल्यामुळेच शांता शेळके यांच्या आळंदीतील साहित्य संमेलनानंतर झालेल्या किती संमेलनातील अध्यक्षांची भाषणे लोकांच्या लक्षात राहिली असतील? त्यांच्या विचारांचा मराठी वाचकांच्या आणि नवोदीत साहित्यिकांच्या मनावर कितीसा परिणाम झाला असेल? हे वेगळे शोधण्याची आवश्यकताच नाही. साहित्य संमेलनाध्यक्षपद आपल्या पद्धतीने वाटून घेणाऱया मंडळींच्या अशा विचारसरणीमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे महत्त्व संपुष्टात येऊ लागले आहे. केवळ गर्दी करणारा सोहळा इतकीच त्याची ओळख बनत आहे. नारळीकरांच्या छापील भाषणापेक्षाही डॉ. तारा भवाळकर यांचे जनसामान्यांच्या-लोकसाहित्यातील जाणिवा या संदर्भाने कोथरूड येथील विभागीय संमेलनातील भाषण अधिक प्रभावी आणि मार्गदर्शक होते. साहित्यिकांचा जर विचारांशी संबंध असेल तर, विचार देणारे जाणते व्यक्ती अध्यक्ष व्हावेत हा आग्रह असला पाहिजे. तरच मराठीला झेपावण्याचे पंख मिळतील. नाहीतर मराठी साहित्य आणि साहित्यिक प्रादेशिक चिखलात असेच लोळवले किंवा झूल घालून खेळवले जातील.
Previous Articleअंतःकरण शुद्ध झाले की,सत्त्वगुण वाढतो अध्याय तेरावा
Next Article युनियन बँक फसवणुकीचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे ?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








