अहमदनगरमधून ऊसतोडणी कामगाराला अटक
प्रतिनिधी /बेळगाव
चालकावर हल्ला करून भाडय़ाची कार पळविल्याच्या आरोपावरून येथील मार्केट पोलिसांनी बीड जिल्हय़ातील एका ऊसतोडणी कामगाराला अटक केली आहे. अहमदनगर येथे त्याला अटक करण्यात आली असून कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
आसाराम (रा. पुनंदगाव, ता. माजलगाव, जि. बीड) असे त्याचे नाव आहे. मार्केट पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
उपलब्ध माहितीनुसार शुक्रवार दि. 22 ऑक्टोबर रोजी रात्री भैरीदेवरकोप्प (ता. धारवाड) येथील एक कारचालक भाडे घेऊन बेळगावला आला होता. भाडे सोडल्यानंतर तो मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पोहोचला. बसच्या प्रतीक्षेत असलेल्या एका दाम्पत्याने त्याला कोल्हापूरला सोडण्याचे सांगितले.
भाडे ठरवून आसाराम व त्याच्या पत्नीला घेऊन कारचालक रात्री कोल्हापूरला निघाला. कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर आम्हाला पुण्याला जायचे आहे, तिथपर्यंत चल, असे दाम्पत्याने सांगितले. आपले भाडे कोल्हापूरपर्यंत ठरले आहे, आपल्याला पुढे येता येत नाही, असे कारचालकाने सांगताच त्याच्यावर हल्ला करून त्याची कार पळविण्यात आली होती.









