अमृतसर बीएसएफ कॅम्पमध्ये अंदाधुंद गोळीबार :12 जखमींवर इस्पितळात उपचार
अमृतसर / वृत्तसंस्था
पंजाबमधील एका सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॅम्पमध्ये रविवारी सकाळी गोळीबाराची दुर्दैवी घटना घडली. अमृतसर येथील छावणीमध्ये कॉन्स्टेबल दर्जाच्या एका जवानाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच अन्य 12 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सहकाऱयांवर गोळीबार केल्यानंतर जवानाने स्वतःवरही गोळी झाडत मृत्यूला कवटाळले. या घटनेनंतर बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी आणि पंजाब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी आणि तपास हाती घेतला आहे.
अमृतसर येथील बीएसएफच्या कॅम्पमध्ये रविवारी सकाळी साडेनऊ ते पावणेदहा वाजण्याच्या सुमारास एका जवानाने स्वतःकडील रायफलमधून सहकाऱयांवर गोळीबार केला. अटारी-वाघा बॉर्डरपासून अवघ्या 12-13 किलोमीटर अंतरावर असलेल्या 144 बटालियनच्या छावणीमध्ये ही रक्तरंजित दुर्घटना घडली. गोळीबार करणाऱया जवानाचे नाव साटेप्पा एस. के. असे आहे. डय़ुटी लावण्यावरून झालेल्या वादामुळे ही घटना घडल्याची माहिती प्राथमिक तपासाअंती पुढे आली आहे. तसेच आता याप्रकरणी ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश देण्यात आले आहेत. हल्लेखोर जवानाने स्वतः गोळी झाडली की अन्य सहकाऱयांनी त्याची हत्या केली याचा उलगडा सखोल तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
अधिक वेळ डय़ुटी लावण्यावरून जवान साटेप्पा एस. के. याचा सहकारी आणि वरिष्ठांसमवेत शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच हा वाद वाढत गेल्यानंतर साटेप्पाने तेथे उपस्थित असलेल्या कमांडिंग ऑफिसरच्या दिशेने गोळीबार केल्याची माहिती बीएसएफ प्रवक्त्याने दिली. साटेप्पाने केलेल्या गोळीबारात अन्य 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजिकच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. या घटनेत बळी गेलेले आणि जखमी झालेले जवान कॉन्स्टेबल आणि हेडकॉन्स्टेबल रँकचे असल्याचेही प्रवक्त्याने यावेळी स्पष्ट केले.
पकडले जाण्याच्या भीतीने झाडली स्वतःवर गोळी
गोळीबाराच्या घटनेनंतर पकडले जाण्याच्या भीतीने साटेप्पाने स्वतःवरही गोळी झाडल्याचा दावा केला जात आहे. स्वतःवर गोळी झाडल्यानंतर तो जागीच कोसळला. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गुरुनानक देव रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच अन्य जखमींपैकी तीन कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या बीएसएफचे अधिकारी या संपूर्ण घटनेवर मौन बाळगून आहेत.