एकूण 49 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक दक्षिण पदवीधर, वायव्य पदवीधर, पश्चिम शिक्षक आणि वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या चार विधानपरिषद जागांसाठी सोमवार दि. 13 रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीतही राज्यातील तिन्ही राजकीय पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली असून जोरदार प्रचाराद्वारे प्रतिष्ठापणाला लावली आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत त्या-त्या मतदारसंघातील व्याप्तीमध्ये मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सोमवार दि. 13 जून रोजी विशेष सुटी मंजूर करण्याचा आदेश सरकारने दिला आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती बसवराज होरट्टी यांच्यासह 49 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. याचबरोबर चार महिलादेखील ही निवडणूक लढवित आहेत. चार मतदारसंघामध्ये एकूण 2,84,922 मतदार असून यात 1,81,773 पुरुष, 1,03,121 महिला आणि 28 इतर मतदारांचा समावेश आहे.
मतदानासाठी एकूण 407 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असून कर्मचारी मतदान केंद्रात रवाना झाले आहेत. 15 जून रोजी पश्चिम शिक्षक, वायव्य शिक्षक आणि वायव्य पदवीधर मतदारसंघांची मतमोजणी बेळगावच्या ज्योती पदवीपूर्व कॉलेजमध्ये होणार आहे. तर दक्षिण पदवीधर मतदारसंघाची म्हैसूरच्या महाराणी महिला कॉलेजमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
4 जुलै रोजी विधानपरिषद सदस्य हणमंत निराणी, के. टी. श्रीकंठेगौडा, अरुण शहापूर, बसवराज होरट्टी यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे रिक्त होणाऱया चार जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विधानसभेवरून विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणूक संपल्यानंतर आणखी एक निवडणूक होत असून विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळविला आहे. वायव्य पदवीधर मतदारसंघातून निजदने निवडणूक लढविलेली नाही. उर्वरित तिन्ही मतदारसंघात आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस आणि भाजपने चारही मतदारसंघातील निवडणूक लढविली आहे.
दक्षिण पदवीधर मतदारसंघत काँग्रेसतर्फे मधु जी. मादेगौडा, भाजपकडून व्ही. रविशंकर, निजदतर्फे एच. के. रामू रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात एकूण 19 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. वायव्य पदवीधर संघात काँग्रेसतर्फे सुनील अण्णप्पा संक, भाजपतर्फे हणमंत निराणी यांच्यासह 11 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. वायव्य शिक्षक संघात भाजपकडून अरुण शहापूर, काँग्रेसतर्फे प्रकाश हुक्केरी, निजदतर्फे चंद्रशेखर एसप्पा लोणी यांच्यासह 12 उमेदवार आहेत. पश्चिम शिक्षक संघात भाजपकडून बसवराज होरट्टी, काँग्रेसतर्फे बसवराज गुरीकार, निजदकडून श्रीशैल गडदीम्मी यांच्यासह 7 जण रिंगणात आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.









