अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
3 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यावर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पदावर परतणार असल्याचा दावा केला आहे. ज्यो बायडेन यांच्याकडून पराभूत होणाऱया ट्रम्प यांनी बुधवारी व्हाईट हाऊसमधील एका नाताळाच्या पार्टीत समर्थकांना संबोधित करताना हे उद्गार काढले आहेत. ट्रम्प 2024 मध्ये पुन्हा रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षीय उमेदवार असू शकतात. परंतु ट्रम्प यांचे वय याप्रकरणी अडसर ठरू शकते.
व्हाईट हाऊसमधील पार्टीत ट्रम्प यांच्या मर्जीतील लोकच सामील झाले. व्हाईट हाऊसमध्ये माझी 4 वर्षे अत्यंत उत्तमप्रकारे पार पडली आहेत. पुन्हा 4 वर्षांसाठी येथे परत येऊ इच्छितो. यंदा नसेल, परंतु पुढील वेळी येथे येईन, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. या पार्टीत रिपब्लिकन पार्टीचे वरिष्ठ नेतेही सामील झाले. परंतु प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्यात आला नव्हता.
अमेरिकेत अध्यक्ष होण्यासाठी असलेल्या अटींनुसार उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा कमी असू नये, परंतु कमाल वयासंबंधी कुठलीच अट नाही. ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान अनेकदा बायडेन यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला होता. बायडेन हे सध्या 78 वर्षांचे आहेत. तर ट्रम्प यांचे वय 74 वर्षे आहे. 2024 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचे वय 78 वर्षे असणार आहे.









