आरोग्य खात्याकडून नियम शिथिल
बेंगळूर : कोरोनाच्या दुसऱया लाटेचा कहर झालेल्या महाराष्ट्र, केरळ, पंजाब आणि चंदीगढ या चार राज्यांमधून कर्नाटकात येणाऱयांसाठी कोविड चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला होता. आता आरोग्य खात्याने या आदेशामध्ये बदल केला असून शुक्रवारी सुधारित आदेश जारी केला आहे. त्यानुसार केवळ कोरोनाची लक्षणे असणाऱयांनाच कोविड निगेटिव्ह अहवाल सादर करणे सक्तीचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर यांनी हा आदेश जारी केला आहे. यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असणाऱया महाराष्ट्र, केरळ, पंजाब आणि चंदीगढ या राज्यांमधून विमानातून येणाऱया प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी 72 तास अगोदर केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक होते. मात्र, हा नियम आता स्थगित करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे नसणाऱया प्रवाशांना अहवाल सादर करण्याची सक्ती असणार नाही.









