प्रतिनिधी/ सातारा
उन्हाळय़ाची चाहुल लागताच वणवा लावण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. मंगळवारी सातारा शहरालागत असलेल्या चार भिंतीच्या लगतच्या डोंगरला वणवा लागला होता. तसेच सायंकाळी उशीरा पेढय़ाच्या भैरोबाच्या डोंगरालाही वणवा लागला होता. तो वणवा आटोक्यात आणण्यासाठी युवकांनी आणि वनविभागाच्या कर्मचाऱयांनी प्रयत्न केले.
सातारा शहरालगत किल्ले अजिंक्यतारा, यवतेश्वराचा डोंगर, पेढय़ाचा भैरोबाचा डोंगर आहे. त्या डोंगरांना वणवे लावण्याचे प्रकार अज्ञातांकडून घडू लागले आहेत. मंगळवारी दुपारी अचानक चार भिंती लगतच्या डोगरला वणवा लागला. याची माहिती विनय माने आणि त्यांच्या मित्रांना समजताच ते तेथे पोहचले. त्यांनी तो वणवा आटोक्यात आणला. तसेच रात्री पेढय़ाचा भैरोबा या डोंगरावर वणवा लागला असल्याचे निदर्शनास येताच सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, कर्मचारी राज मुसलगे, पावरा, सुनील भोईटे हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तत्काळ वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ज्या खाजगी क्षेत्रात वणवा लागला तेथून काही अंतरावरच वन विभागाचे क्षेत्र असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वनवा आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री बारा वाजता वणवा आटोक्यात आणण्यात यश आले.








