देशविरोधी कारवायांसाठी स्लीपर सेल बनवल्याचा ठपका
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेश एटीएसने बंदी घातलेल्या जमात-ए-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या 4 सदस्यांना भोपाळमधून अटक केली आहे. आरोपी जिहादी कारवायांमध्ये सामील असून ते देशविरोधी कारवाया करण्यासाठी रिमोट बेस/स्लीपर सेल तयार करत असल्याचे दिसून आले आहे. यासंबंधी सध्या तपास यंत्रणांकडून चौघांचीही चौकशी सुरू आहे. आरोपींकडून मोठय़ा प्रमाणात जिहादी साहित्य, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सदर संशयित आरोपी कट्टर तालिबानी विचारसरणीचे आहेत.
भोपाळच्या ऐशबाग पोलीस स्थानकापासून 200 मीटर अंतरावर हे दहशतवादी भाडय़ाच्या घरात राहत होते. संशयित परिसरात राहून संशयास्पद कारवाया करत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर एटीएसने शनिवारी रात्री उशिरा संशयित ठिकाणी छापे टाकून चौघांना पकडले. प्राथमिक चौकशीत चौघेही बांगलादेशी असल्याची माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 32 वषीय फजहर अली उर्फ मेहमूद, 24 वषीय मोहम्मद अकील उर्फ अहमद, 28 वषीय जहूरुद्दीन उर्फ इब्राहिम आणि फजहर यांचा समावेश आहे.
‘जेएमबी’वर केंद्राकडून बंदी
अटकेतील चारही सदस्य जमात-ए-मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) या प्रतिबंधित संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. ‘जेएमबी’ने पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते. तसेच 2018 मध्ये बोधगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटात या संघटनेचा सहभाग उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने 2019 मध्ये जेएमबीला 5 वर्षांसाठी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित केले होते. या बंदीनंतरही जेएमबी देशभरात वेगवेगळय़ा ठिकाणी स्लीपर सेल चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.









