सेन्सेक्स 166 अंकांनी वधारला – रिलायन्स मजबूतीमध्ये
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ात घसरणीचे सत्र राहिले होते. परंतु या घसरणीला मात्र अंतिम दिवशी शुक्रवारी ब्रेक लागल्याचे पहावयास मिळाले आहे. सेन्सेक्सने 166 अंकांनी तेजी नोंदवली असून यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 166.07 अंकांसह 0.32 टक्क्यांची तेजी प्राप्त करत निर्देशांक 52,484.67 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 42.20 अंकांच्या मदतीने 0.27 टक्क्यांची तेजी मिळवत निर्देशांक 15,722.20 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांपैकी सर्वाधिक एक टक्क्यांच्या तेजीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग राहिले असून यासोबत आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, टायटन आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये टाटा स्टील, पॉवरग्रिड कॉर्प, एशियन पेन्ट्स, सन फार्मा आणि बजाज ऑटोसह अन्य समभाग घसरणीत राहिले आहेत.
शुक्रवारच्या सत्रात आर्थिक, औषध आणि रियल्टी निर्देशांकात सुधारणात्मक वातावरण राहिले होते. तर धातू आणि दैनंदिन वापरातील साहित्याची निर्मिती करणाऱया कंपन्यांमध्ये(एफएम
सीजी) नफा वसुलीचे वातावरण राहिले होते. मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभागांच्या मजबूत कामगिरीचा फायदा भारतीय भांडवली बाजाराला झाला असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
आठवडय़ातील अंतिम सत्रात बाजाराने कल अचानक तेजीत बदलला असल्याने येत्या काळात बाजार कोणता टप्पा प्राप्त करणार आहे, याचा अंदाज सध्यातरी निश्चित करणे अवघड असून पुढील आठवडय़ातील पहिल्या काही दिवसात कामगिरीदरम्यानच चित्र स्पष्ट होणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.







