ऑनलाईन टीम / पॅरिस :
फ्रान्सच्या ‘चार्ली हेब्दो’ या नियतकालिकाने पुन्हा एकदा मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. त्यामध्ये ‘इतिहासाचे पुनर्लेखन करता येणार नाही किंवा तो इतिहास पुसला जाऊ शकत नाही,’ असेही म्हटले आहे. त्यामुळे अल-कायदाने चार्ली हेब्दोला पुन्हा एकदा 2015 सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
चार्ली हेब्दोने 2015 मध्ये मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र प्रकाशित केले होते. त्यावेळी अल कायद्याने त्यांच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात 17 जण ठार झाले होते. त्यामध्ये संपादकीय विभागाचे 12 सदस्य आणि तिन्ही हल्लेखोर यांचा समावेश होता.
हल्लेखोरांना शस्त्रे आणि रसद पुरवल्याचा आरोप असलेल्या 13 पुरुष आणि एका महिलेविरुद्ध बुधवारपासून सुनावणी सुरू झाली आहे. या आठवड्यात कार्टून्ससह प्रकाशित झालेल्या एका संपादकीयमध्ये नियतकालिकाने म्हटले होते की, हल्ल्यांनंतर त्याने मोहम्मदचे कार्टून प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतला होता, पण खटला सुरू झाल्यामुळे गरज पडल्यास त्याने व्यंगचित्र प्रकाशित केले.
नियतकालिकाचे संचालक लॉरेंट रिस सौरिसू यांनी संपादकीमध्ये लिहिले आहे की, आम्ही कधीही नतमस्तक होणार नाही, कधीही हार मानणार नाही. चार्ली हेब्दोच्या नव्या आवृत्तीत, मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्रासह पहिल्या पानावर डझनभर व्यंगचित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. कार्टून बनवणारा जीन कबट 2015 च्या दहशतवादी हल्ल्यात ठार झाला होता. हे सर्व त्याच्यासाठी सुरू आहे, असे सौरिसू यांनी म्हटले आहे.









