बेळगावमध्ये उभारणार 75 चार्जिंग स्टेशन
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील वायू प्रदूषण कमी करून इंधनाच्या साठय़ाची बचत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये विद्युत चार्जिंग स्टेशन उभारण्यास सुरुवात केली आहे. 31 जिल्हे व 240 तालुक्मयांमध्ये 1 हजार 190 चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यासाठी सरकारी जागांची पाहणी करण्यात आली असून निविदा काढल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तालुका पंचायत कार्यालय, सरकारी रुग्णालये, बसस्थानके या सरकारी जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारी जागांवर 1 हजार चौरस फुटात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. मध्यंतरी कोरोनामुळे हा प्रस्ताव रखडला होता. परंतु आता पुन्हा एकदा या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. चार्जिंग स्टेशनसाठी एलटी 6 वीजपुरवठा केला जाणार असून त्यासाठी प्रतियुनिट 5 रुपये दर आकारला जाण्याची शक्मयता आहे. राज्यातील 7 महानगरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेतून 600 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्यातील 50 टक्के चार्जिंग स्टेशन ही स्मार्ट सिटीअंतर्गत उभारली जाणार आहेत. यासाठी निविदाही काढण्यात आल्या आहेत. हेस्कॉमअंतर्गत येणाऱया 7 जिल्हय़ांमध्ये 250 चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मागील दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली आहे. या वाहनांना चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी सरकारने फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक आहे. चार्जिंग स्टेशनच्या परिसरातच उपहारगृह सुरू करण्याची परवानगी दिल्यास त्याचा फायदा होणार आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर चालणाऱया वाहनांमध्ये इलेक्ट्रिक सर्किट बसविण्यासाठी राज्य सरकारने तंत्रज्ञान विकसित करावे, अशी मागणी केली जात आहे.









