चापगाव ग्रामपंचायत समितीतर्फे बस आगार प्रमुखांना निवेदन : विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन
वार्ताहर /चापगाव
खानापूर बस आगारातून लालवाडी-चापगाव कोडचवाडपर्यंत या मार्गावर सोडण्यात येणाऱया बस वेळेत बदल करावा व विद्यार्थ्यांना सोयीचे करण्यात यावे. तसेच वड्डेबैल गावात बसेस सोडण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन चापगाव ग्रा.पं. समितीतर्फे खानापूर बस आगार प्रमुख लोखंडे यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष मारुती चोपडे, सदस्य सूर्याजी पाटील, नजीर सनदी, माजी उपसभापती सयाजी पाटील, पिराजी मादार, हणमंत मादार, पिराजी कुऱहाडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, चापगाव-खानापूर मार्गावर सकाळी व दुपारी सोडण्यात येणाऱया बसेस अनियमित येत आहेत. चापगाव भागातून खानापूर-बेळगावला कॉलेजसाठी जाणाऱया विद्यार्थ्यांना सकाळी 7 वाजताची बस सोडावी, सध्या येणारी बस 7.30 ते 8 च्या दरम्यान येत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना क्लासेस चुकत आहेत. यासाठी 7.30 ची बस ठीक 7 वा. चापगाव येथून सोडण्यात यावी. तसेच सकाळी 8.30 वाजता येणारी बस सकाळी 9 वाजता सोडण्यात यावी. त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता खानापूर येथून चापगाव मार्गावर परतीची बस सोडावी, अशी मागणी केली आहे. निवेदनाचा स्वीकार करून बस आगार प्रमुख लोखंडे यांनी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल व मागणीनुसार बसेस सोडण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
वड्डेबैल गावात बसेस सोडण्याची मागणी
खानापूर-चापगाव ते कोडचवाडपर्यंत धावणाऱया बसेस याच पंचायतीतील वड्डेबैल गावच्या क्रॉसपर्यंत सोडण्यात येतात. सदर क्रॉसपासून अर्धा किलोमीटर अंतरावर वड्डेबैल गाव आहे. यापूर्वी प्रत्येक बस गावच्या वेशीपर्यंत जात होती. परंतु अलीकडे गावात जाणाऱया बसेस बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वड्डेबैल गावच्या लोकांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी चापगाव मार्गावर धावणाऱया प्रत्येक बसेस वड्डेबैल गावापर्यंत सोडण्यात याव्यात व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशीही मागणी यावेळी सदर ग्रामपंचायत समितीच्यावतीने करण्यात आली.









