आजपासून देवस्थानचा वार्षिक यात्रोत्सव : शनिवार दि. 27 रोजी मंदिराचे उद्घाटन : रवि. दि. 28 पर्यंत कार्यक्रम
वार्ताहर / चापगाव
चापगाव येथील श्री फोंडेश्वर देवस्थानला पुरातन काळाचा इतिहास आहे. या मंदिराचा दरवषी माघ महिन्यात वार्षिक उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. या वषीही सदर उत्सव गुरुवार दि. 25 पासून आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाची सांगता रविवार दि. 28 रोजी होणार आहे. या निमित्ताने गुरुवारी सकाळी नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराची वास्तुशांती होणार आहे. दुपारी 12 वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवार दि. 26 रोजी दुपारी 3 वाजता श्री फोंडेश्वराचा लक्ष्मी मंदिरापासून पालखी सोहळा निघणार आहे. सायंकाळी 7 वाजता मंदिराच्या आवारात संत साहित्यावर शिवाजीराव भुकेले, गडहिंग्लज यांचे व्याख्यान होणार आहे.
शनिवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. 28 रोजी सकाळपासून नवसफेड व ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता श्रींचा पालखी सोहळा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने रविवार दि. 28 रोजी रात्री 10 वाजता खुल्या डान्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याकरिता आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
श्री फोंडेश्वर देवस्थानला पुरातन काळाचा इतिहास, सीमाभागाच्या अनेक ठिकाणी इतिहासाला साक्ष देणारे गड-किल्ले व पुरातन मंदिरे आहेत. त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुकापैकी मौजे चापगाव या ठिकाणी असलेले ग्रामदैवत श्री फोंडेश्वर मंदिर एक आहे. या मंदिराला पांडवकालीन इतिहास आहे. अश्वमेघ यज्ञ नंतर विश्व भ्रमण करणारा घोडा दक्षिण भारतात असलेल्या हस्तिनापूर सम्राट हंसध्वज राजाच्या साम्राज्यात येतो. त्यावेळी हंसध्वज राजाचे वीर व भगवान श्रीकृष्ण भक्त असलेले पुत्र सुरत आणि सुधन्वा यांच्याशी घनघोर युद्ध होते. या युद्धात सुधन्वा व सुरत हे वीर गतीला प्राप्त होतात. ते पुंड होते, यावरून त्यांना आजच्या काळात फेंडेश्वर नावाने ओळखले जाते. अर्जुनाशी झालेल्या सुरत, सुधन्वा यांच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण साक्षी राहिले होते. अर्जुनासारखेच तेही श्रीकृष्ण होते. त्यावेळी तीन बाणांमध्ये अर्जुनाने सुरत, सुधन्वाचा शिरच्छेद करण्याचा प्रण घेतला होता. यामुळे श्रीकृष्णालाही दोन्ही भक्तांना सावरणे अवघड झाले. पण भगवंताने दोन्ही भक्तांना श्रे÷ ठरविण्यासाठी अर्जुनाच्या बाणाने झालेला सुधन्वाचा शिरच्छेद भूमीवर पडू दिला नाही. त्यामुळे विष्णू पुराणातही सुधन्वाचा उल्लेख प्रकर्षाने जाणवतो. पुरातन काळापासून या देवस्थानला भगवंताच्या साक्षीने पावन झालेली भूमी म्हणून पूर्वीचे चंपावती नगर सध्याचे चापगाव या नावाने ओळखले जाते. श्री फोंडेश्वर म्हणजे सूरत आणि सुधन्वा यांची नावे आहेत. ते दोघेही पुंड होते. म्हणून या नावावरून त्या देवस्थानला फोंडेश्वर असे ओळखले जाते.
1 कोटीतून भव्य मंदिर
सदर मंदिर पुरातन काळापासून फारच लहान होते. या मंदिराच्या विकासासाठी 2011 मध्ये गावातील पंच कमिटीने जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. तात्कालीन माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या प्रेरणेतून या मंदिराच्या उभारणीचा संकल्प हाती घेण्यात आला. मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुऱहाडे यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कामाला सुरुवात करण्यात आली. विविध कार्यक्रमांचे आयोजन करत देणगी जमा करण्यात आली. गावातील उद्योजक व पुणे या ठिकाणी कार्यरत असलेले श्री कन्स्ट्रक्शनचे मालक किसन बेळगावकर यांनी मंदिराचा कळस व गाभाऱयाची संपूर्ण जबाबदारी घेऊन निम्मी जबाबदारी उचलली आहे. शिवाय माजी आमदार अरविंद पाटील यांनी आमदार असताना 5 लाखांचा निधी मंजूर केला आहे. अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी भव्य असे जवळपास 1 कोटी रुपयांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचा लोकार्पण सोहळा दि. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान साजरा होत आहे. यात्रा कमिटी, ग्रामस्थ व कमिटीने याची जय्यत तयारी केली आहे.









