जखिणवाडीतील नऊ जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / कराड
जखिणवाडी (ता. कराड) येथे एकावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यावरूनच युवकाचे अपहरण झाल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी कराड पोलिसात नऊजणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. ऋतिक भीमराव झिमरे (वय 20 रा. जखिणवाडी) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी भीमराव हरीबा झिमरे (रा. जखिणवाडी) यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. ऋतीक हा त्यांचा मुलगा दोन वर्षापासून मलकापुरातील एका फर्निचर मॉलमध्ये कामास आहे. 2 फेब्रुवारीला गावात देवेंद्र अशोक येडगे याच्यावर उत्सव उत्तम शिंदे याने चाकूने वार केले होते. या प्रकरणी देवेंद्र येडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान उत्सव शिंदे व ऋतिक हे लहानपणापासून मित्र आहेत. या कारणावरुन चाकू हल्ल्यातील जखमी देवेंद्र अशोक येडगे याचा भाऊ अविनाश अशोक येडगे याने चाकू हल्ल्याचा राग मनात धरुन ऋतिक यास आणि तुझा चुलत भाऊ राकेश आनंदा झिमरे, तुमचा चाकू हल्ल्याशी संबंध आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी ऋतिक याच्यासोबत फर्निचर दुकानात कामास असलेला मित्राने याने ऋतिकच्या वडिलांना घरी येऊन सांगितले की, ऋतिकला मलकापूर येथून अविनाश अशोक येडगे याने व त्याच्यासोबतच्या आठ ते नऊजणांनी मारहाण केली. त्यानंतर मोटारसायकलवरुन जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. ऋतिकच्या वडिलांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला तर स्वीच ऑफ लागला. काल अविनाश येडगे यानेच अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणाचा शहर पोलिसांनी तपास सुरू केला असून संशयितांचा शोध सुरू केला आहे.









