मुंबईतील गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मुंबईतील मंडळांशी बैठका घेऊन निर्णय घ्यायला लावले त्याप्रमाणे येत्या काही दिवसात चाकरमान्यांच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी मागणी वाढत आहे.
कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असतानासुद्धा अद्याप कोकणात जाणाऱया चाकरमान्यांच्या मार्गातील विघ्न काही कमी होताना दिसत नाहीत. आज राज्यात शिवसेनेचे सरकार सत्तेवर असताना कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी सरकारचे धोरण संदिग्धच असल्याचे बघायला मिळत आहे. कोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे चाकमान्यांना गणपतीसाठी कोकणात येऊ देणार नसल्याचे सांगतात, तर परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात की चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी एसटी सोडणारच. मात्र अद्याप कोणतीही ठोस भूमिका किंवा निर्णय सरकार घेत नाही. एक तर सरकारने स्पष्ट सांगितले पाहिजे ज्याप्रमाणे गेली अनेक वर्षाची परंपरा असणाऱया वारीबाबत सरकारने निर्णय घेतला त्याप्रमाणे एकतर ठोस निर्णय घ्या नाही तर चाकरमान्यांसाठी आचारसंहिता करून त्यांना जाण्यासाठी अटी आणि शर्तीवर परवानगी द्यावी. मात्र असे काही होताना दिसत नसल्याने मुंबईतील चाकरमानी सध्या मोठय़ा पेचात पडले आहेत. कोकणातील ग्रामपंचायतही विलगीकरणाचा कालावधी कमी करण्यासाठी तयार नाही. त्यात तेथील स्थानिक नेतृत्व हे गावकऱयांच्या बाजूने असल्याचे सध्या तरी दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रत्येक गोष्टीत राजकारण होताना दिसत आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱया चाकरमान्यांना 14 दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक म्हटले आहे. मात्र दुसरीकडे राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी विमान प्रवास करून एका आठवडय़ापेक्षा कमी कालावधीसाठी राज्यात राहणार आहेत त्यांच्यासाठी क्वारंटाईन होण्यापासून सूट दिली आहे. कोरोनाच्या काळात परराज्यातील लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी बेस्ट, एसटी आणि रेल्वेयंत्रणा राज्य सरकारने वापरली. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी वापरला. मात्र चाकरमान्यांसाठी अद्याप सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही. उलट सरकारने कोकणातील गणेशोत्सवासाठी आधीच उपाययोजना केली पाहिजे होती. मात्र चाकरमानी कोकणात जाण्यासाठी वारंवार अर्ज करूनही ईपास नामंजूर होत आहेत. यामध्ये सर्वाधिक सिंधुदुर्ग जिह्यामधील अर्जदार आहेत. खाजगी एजंट यांनीही शुल्क वाढविले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच आर्थिक लूट होत आहे.
कोणत्याही परिस्थितीत गावी गणपतीला जाणारच अशी भावना असणारा कोकणी माणूस हा गणपतीसाठी रजेचा अर्ज देतानाच सोबत राजीनामापत्रही घेऊन जातो, असे नेहमी उपहासाने बोलले जाते. यावरून कोकणी माणसाच्या मनात गणपती या सणाचे असणारे महत्त्व लक्षात येते. आज मात्र कोरोनामुळे आधीच अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. त्यातच आर्थिक विवंचना असताना केवळ सरकारने एसटी सुरू केली तरच आपण गावी जाऊ शकतो किंवा तरच जायचे अशी अनेक कुटुंबे सरकारच्या निर्णयाकडे आस लावून बसले आहेत. गावकऱयांना गावी यायचे असेल तर 7
ऑगस्टपर्यंत यावे लागेल असा नियम केल्याने सरकारपुढे मोठा प्रश्न आहे. परप्रांतीय त्यांच्या राज्यातील गावाला जाऊन परत आले तरी आम्हाला आमच्याच राज्यातील गावाला जाता येत नाही. सरकारने सरसकट ई पासची अट रद्द करावी आणि एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी चाकरमान्यांची आहे. मुंबईतील अनेक आमदार, नगरसेवक दरवर्षी आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी मोफत किंवा वाजवी दरात एसटीसेवा देत असतात. मात्र सरकारचा निर्णय होत नसल्याने हे लोकप्रतिनिधीही काही करू शकत नाही. दुसरीकडे अभिनेता सोनू सूद कोकणातील चाकरमान्यांसाठी धावून आला आहे. त्याने लालबाग, परळ येथील काही भागातील लोकांसाठी मोफत बससेवा सुरू केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था केली आहे. आता लोकांच्या नजरा सरकारच्या घोषणेकडे आहे. सरकार काय घोषणा करते आणि गावच्या ग्रामपंचायती काय निर्णय घेतात, अशा दोन्हीची काळजी चाकरमान्यांना आहे. पंधरा दिवसांपूर्वी स्वत: परिवहन मंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांसाठी काही अटींवर एसटीने गावी जाण्याची परवानगी देण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगितले होते. मात्र त्याबाबत अद्याप काहीच पुढे झालेले नाही. आता जसजसे गणपतीचे दिवस जवळ येऊ लागले आहेत तसतसे कोकणातील गणेशोत्सवाच्या मुद्यावरून राजकारण रंगायला लागले आहे.
भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकणी जनतेला फसवण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका केली आहे. सत्ताधारी मंडळींचे म्हणणे आहे की विरोधी पक्षाचे लोक चाकरमानी आणि गावचे लोक यांच्यात भांडणे लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे आता सरकारने याचे अधिक राजकारण न करता चाकरमान्यांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, क्वारंटाईन कालावधी किती असावा, ई पासबाबत होणारा काळाबाजार तसेच एसटीबाबतदेखील निर्णय घ्यावा. हे निर्णय घेताना केवळ भावनेच्या आहारी न जाता आयसीएमआरच्या निर्देशाप्रमाणे तसेच चाकरमान्यांनी थोडा समजूतदारपणा दाखवणेदेखील गरजेचे आहे अन्यथा कोकण, गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यात मोठे अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वत: मुंबईतील मंडळांशी बैठका घेऊन निर्णय घ्यायला लावले त्याप्रमाणे येत्या काही दिवसात निर्णय घ्यावा. प्रत्येकवेळी फक्त लवकरच निर्णय होईल, या एका वाक्यावर वेळ मारून नेऊ नका. सरकारने कोणता तरी ठोस निणय घेण्याची आज गरज आहे.
प्रवीण काळे








